Pune News : भांडखोर शेजाऱ्यांना कंटाळून महिलेची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

एमपीसी न्यूज : सतत टोमणे मारून त्रास देणाऱ्या शेजाऱ्यांना कंटाळून एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. पुणे जिल्ह्यातील नारायणगावात हा प्रकार घडला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. 

अनिता संभाजी पडवळ (रा. अष्टविनायक रेसिडेन्सी खोडद रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर) असे विहिरीत उडी मारून आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर या महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राहुल गंगाधर दुशिंग, रूपाली राहुल दुशिंग, प्रवीण गंगाधर दुशिंग, राजश्री प्रविण दुशिंग, गंगाधर भागाजी दुशिंग यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत अनिता पडवळ आणि आरोपी एकाच सोसायटीत शेजारी शेजारी राहत होते. दुशिंग कुटुंब हे अनिता पडवळ यांना वेळोवेळी टोमणे मारून मानसिक त्रास देत होते. तर भांडणातून आरोपींनी अनिता पडवळ यांना शिवीगाळ करत मारहाणही केली होती. आरोपींच्या या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून अनिता यांनी एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

दरम्यान बुधवारी दुपारी त्यांचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. त्यानंतर विशाल संभाजी पडवळ यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.