Pune News : धक्कादायक ! पिस्तुल नाचवत साजरा केला मयत गुन्हेगाराचा वाढदिवस

एमपीसी न्यूज : काही दिवसांपूर्वी पुण्यात गुंडाच्या अंत्ययात्रेदरम्यान त्याच्या साथीदारांनी बाईक रॅली काढल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर पोलिसांच्या कारभारावर चहूबाजूने टीका झाली होती. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात असाच आणखी एक प्रकार. मृत्यूमुखी पडलेल्या एका सराईत गुन्हेगाराचा त्याच्या सहकाऱ्यांनी वाढदिवस साजरा केला.

धक्कादायक म्हणजे हा वाढदिवस साजरा करत असताना पिस्तूल नाचवत त्याच्या नावाचा जयघोष देखील करण्यात आला. अक्षय उर्फ प्रसाद कानिटकर (वय 22, रा. बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या सर्व प्रकारानंतर या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाई करण्यास सुरुवात केली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांपासून स्थानिक पोलीस अनभिज्ञ कसे राहतात हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

सराईत गुन्हेगार भावेश कांबळे याचा काही महिन्यांपूर्वी खून झालेला आहे. मात्र त्याचा वाढदिवस गेल्या महिन्यात (दि. 7 जुलै) झाला. त्याचा वाढदिवस साजरा करताना त्याच्या काही मित्रांनी चांगलाच धिंगाणा असल्याचे आता समोर आले आहे.

भावेश याचा घरासमोर एकत्र जमलेल्या दहा ते पंधरा जणांनी खुलेआम हातात पिस्तुला नाचवल्या, तर त्याच्या नावाचा जोरजोरात जयघोष देखील यावेळी करण्यात आला. संपूर्ण बिबवेवाडी परिसरात या घटनेची चर्चा सुरू असताना पोलीस मात्र याकडे कानाडोळा का करत होते असा प्रश्न स्थानिक नागरीक विचारत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.