Chikhali Crime News : धक्कादायक! आठ वर्षीय मुलाचा ‘या’ कारणावरुन केला खून, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – चिखली येथे रविवारी (दि.17) आठ वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. गुंडा विरोधी पथकाने याप्रकरणी आज (मंगळवार, दि.19) एका आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, या खूनाचे कारण समोर आले असून, लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून हा खून केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

लक्ष्मण देवासी (वय 8, रा. हरगुडे वस्ती, चिखली मुळगाव राजस्थान) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा देवासी कुटुंबीयांच्या घराजवळ रहायला होता व मागील चार दिवसांपासून परिसर सोडून गेला होता. आरोपीने लक्ष्मण देवासी याला पडक्या घरात घेऊन जात त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलाने त्यासाठी विरोध केला. मुलगा आपले नाव घरी सांगेल तसेच पोलिसांत तक्रार दाखल होईल या भितीने आरोपीने दगडाने ठेचून देवासी याचा खून केला. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने दिलेली माहिती पोलीस पडताळून पाहत आहेत.

दरम्यान, लक्ष्मण देवासी याच्या आई वडिलांनी रविवारी सायंकाळी चिखली पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर रात्री साडे आठच्या सुमारास मुलाचा खून झाल्याचे उघडकीस आले. आठ वर्षीय मुलाच्या खुनाची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी चिखली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. आरोपीचा शोध घेऊन अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका जमावाने घेतली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.