Dehuroad News : धक्कादायक ! मधुमेहाच्या खर्चासाठी पत्नीला बुधवार पेठेत नेऊन वेश्या व्यवसाय करण्याची धमकी

पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लग्नापूर्वीपासून पतीला मधुमेह होता. ही बाब लग्नाच्या वेळी विवाहिता आणि तिच्या माहेरच्या लोकांपासून सासरच्या लोकांनी आणि लग्न जमवणा-या मध्यस्थीने लपवून ठेवली. पतीने त्याच्या मधुमेहाच्या औषधोपचाराच्या खर्चासाठी पत्नीला पुण्यातील बुधवार पेठेत नेले आणि तिला वेश्या व्यवसाय कर असे म्हटले. तसेच सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला असल्याची फिर्याद पिडीत विवाहितेने दिली आहे.

सासू, सासरे, मामी, मामा, जाऊ, दीर, पती आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 8 डिसेंबर 2020 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत संभाजी चौक, पाषाण येथे घडला. विवाहितेने माहेरी आल्यानंतर याप्रकरणी 30 मार्च रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या मधुमेहाच्या उपचारासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी सासू आणि सास-याने फिर्यादी विवाहितेला दमदाटी, शिवीगाळ करून मारहाण करत तिचा शारीरिक व मानसिक जाचहाट केला.

फिर्यादीच्या पतीला लग्नापूर्वी पासून मधुमेह होता ही बाब लग्न जमवताना मध्यस्थी असलेल्या मामा, मामीने फिर्यादी पासून लपवून ठेवली. याबाबत फिर्यादीने मामा आणि मामीकडे विचारणा केली असता असता मामा, मामी आणि जाऊ यांनी फिर्यादीस शिवीगाळ केली.

मामी, दीर आणि एका व्यक्तीने फिर्यादी समोर कमी कपडे घालून तिच्यासमोर गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.

आरोपी पतीने त्याच्या मधुमेहाच्या औषधोपचारासाठी लागणा-या खर्चासाठी फिर्यादीस वेश्या व्यवसाय चालणा-या बुधवार पेठेत नेले. तिथे फिर्यादीला वेश्या व्यवसाय कर अशी पतीने विचारणा केली. फिर्यादीने वेश्या व्यवसाय करण्यास नकार दिल्याने पतीने फिर्यादीसोबत अनैसर्गिक संभोग केला. विवाहीतेच्या माहेरच्या लोकांनी दिलेले स्त्रीधन परत न देता फिर्यादीस घरातून हाकलून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.