Petrol Diesel Prices : इंधन दरवाढ सुरूच; नऊ दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 5.60 रुपयांची वाढ

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा धडाका सुरू आहे. या इंधन दरवाढीने जनतेची होरपळ सुरू झाली आहे. मागील नऊ दिवसांत इंधनवाढीमध्ये तब्बल आठवेळा दरवाढ झाली. त्यामुळे या काळात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर 5.60 रुपयांची वाढ झाली आहे. बुधवारीही पेट्रोल-डिझेल प्रत्येकी 80 पैशांनी महाग झाले.

मागील नऊ दिवसांतील सततच्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोल 115.88 रुपयांवर गेले आहेत, तर डिझेलनेसुद्धा शंभरी ओलांडली आहे. डिझेलचा प्रतिलिटर दर 100.10 पर्यंत गेला आहे. बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे दर 84 पैसे आणि 85 पैशांची वाढ झाली. याचवेळी राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100.21 रुपयांवरून 101.01 वर तर डिझेलचा भाव प्रतिलिटर 91.47 रुपयांवरून 92.27 रुपयापर्यंत वाढला आहे.

विधानसभा निवडणुका संपण्याआधी काही महिने इंधनाचे दर ‘जैसे थे’ राहिले होते. मात्र निवडणुका संपताच दरवाढीने कहर केला आहे. 22 मार्चपासून देशभर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. या दरवाढीचे संसदेत जोरदार पडसाद उमटू लागले आहेत. विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू ठेवला आहे. इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. इंधन दरवाढीचे सर्वसामान्य जनतेला चटके बसू लागल्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.