Pimpri News : जलपर्णी काढण्याची दीड कोटींची निविदा अल्प मुदतीची!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा या 3 नदीपात्रांत जलपर्णीच्या बिया वाढून जलपर्णी फोफावत असल्याचा दावा करत महापालिका प्रशासनाने जलपर्णी काढण्याची अल्प मुदतीची निविदा प्रसिध्द केली आहे. या कामाची निविदा नोटीस शनिवारी प्रसिद्ध झाली असून, गुरुवारी (दि. 24) तातडीने उघडली जाणार आहे. सहा भागात विखुरलेल्या या कामासाठी 1 कोटी 49 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित घरण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयुक्त राजेश पाटील हे प्रशासक आहेत. महापालिकेच्या विविध कामांच्या निविदा काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. आता नदीपात्रातील जलपर्णी काढण्याची निविदा प्रसिद्ध झाली आहे. नदीपात्रात जलपर्णीच्या बिया वाढल्या आहेत. त्या वाढतच असून, त्यामुळे पात्रात हिरवळ वाढत आहे. त्याची पूर्ण वाढ झाल्यास नदीकाठच्या रहिवाशांना डास आणि दुर्गंधीचा मोठा त्रास होतो. त्यामुळे जलपर्णी वाढून पात्र भरून जाण्यापूर्वी त्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्धार अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी केला आहे.

या वर्षी हे जाळे काढण्यासाठी दीड कोटी रुपयांची तयारी केली आहे. पावसाळा संपला की निविदा प्रसिद्ध करायची आणि कंत्राटदाराकडून स्पायडर मशिन, जेसीबी आणि इतर यंत्रणा वापरून जलपर्णी काढली असे भासवायचे. प्रत्यक्षात जलपर्णी काढण्याऐवजी ती कापून पुढे ढकलायची अशी पद्धत रूढ आहे. जलपर्णी कापल्याने ती निघून जात नाही. ती पुढच्यावर्षी पुन्हा फोफावते.

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीनही नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी नव्याने निविदा मागविण्यात आल्या आहेत. पवना नदीचे पात्र 24 किलोमीटर, इंद्रायणीचे 19 आणि मुळा नदीचे 10 किलोमीटर आहे. त्यासाठी 6 पॅकेज तयार करण्यात आले आहेत. पवना नदीच्या सांगवडे ते रावेत बंधारा या 4.97 किलोमीटर अंतरासाठी 16 लाख 41 हजार 344 रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.  रावेत बंधारा ते चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिरापर्यंत या 4.97 किलोमीटरसाठी 16 लाख 41  हजार 344 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मुळा नदीच्या वाकड ते दापोडी संगम या 10. 20 किलोमीटर अंतराच्या पात्रासाठी 28 लाख 47 हजार 88 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.  पवना नदीच्या चिंचवडगाव ते कासारवाडीतील टाटा ब्रिज या 8.66 किलोमीटर अंतराच्या कामासाठी 21 लाख 23 हजार 642 रुपये खर्च येणार आहे.  पवना आणि मुळा नदीच्या टाटा ब्रिज ते बोपखेल या 10.75 किलोमीटर अंतराच्या स्वच्छतेच्या कामासाठी 28 लाख 47 हजार 88 रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे.

इंद्रायणी नदीच्या तळवडे येथील सिंटेल कंपनी ते हिरामाता मंदिर, एसटीपी केंद्रापर्यंतच्या  20.54 किलोमीटर अंतराचे पात्र स्वच्छ करण्याकामी 38 लाख 11 हजार 683 रुपये खर्च अपेक्षित आहे. ठेकेदारांना ई निविदा 23 मार्च दुपारी तीन वाजेपर्यंत परत येणार आहे तर 24 तारखेला तातडीने निविदा खोलण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.