Thergaon News: ‘ग्रेडसेपरेटर’ कामाच्या संथगतीमुळे वाहतूक कोंडी, कामाला गती द्या – खासदार श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – थेरगाव डांगे चौकातील ग्रेडसेपरेटरच्या कामाची मुदत संपली तरी देखील ठेकेदार काम वेळेत पूर्ण करु शकला नाही, शिवाय अतिशय संथ गतीने काम चालू आहे. त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रेडसेपरेटरच्या कामाला गती द्यावी, लवकरात-लवकर ग्रेडसेपरेटरचे काम पूर्ण करावे, ग्रेडसेपरेटरमुळे भविष्यात आजूबाजूला अपघात होणार नाही त्याची काळजी घ्यावी आणि त्यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिका-यांना दिल्या.

महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या थेरगाव, डांगे चौकातील ग्रेडसेपरेटरचे काम संथ गतीने चालू असल्याने त्रस्त व्यापारी, स्थानिक नागरिकांनी खासदार बारणे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने खासदार बारणे यांनी आज (मंगळवारी) महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या समवेत डांगे चौकातील ग्रेडसेपरेटरच्या कामाची पाहणी केली.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, युवासेना अधिकारी विश्वजित बारणे, ग प्रभाग अधिकारी रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, उपअभियंता चंद्रशेखर धानोरकर, संध्या वाघ, जगताप, अमोल थोरवे, स्तूंप कंन्सलंटटचे अधिकारी गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ‘डांगे चौक हा थेरगाव येथील मध्यवर्ती आणि वर्दळीचा चौक आहे. सांगवी फाटा ते किवळे बीआरटीएस रस्त्यावर हा चौक येतो. या चौकातून रावेत, हिंजवडी, चिंचवडगाव, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणी वाहनांची ये-जा सुरु असते. या चौकातून मुंबई-बंगळुरु महामार्ग, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाला देखील जाता येते. त्यामुळे या चौकात नेहमी वाहनांची मोठी गर्दी असते. ग्रेडसेपरेटरचे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे’.

ग्रेडसेपरेटरच्या कामाची मुदत संपली तरी देखील ठेकेदार काम वेळेत पूर्ण करु शकला नाही. गणेशनगर, थेरगावठाणाकडे जाणा-या रस्त्याला ‘अप्रोच’ ठेवला नाही. त्यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्या त्रुटी दूर कराव्यात. त्यातून मार्ग काढावा. संथगतीने काम सुरु असल्याने व्यापा-यांना मोठी अडचण होत आहे. ग्राहकांना वाहने पार्किंग करण्यासाठी जागा राहत नाही. त्यासाठी ग्रेडसेपरेटरच्या कामाला गती द्यावी.

लवकरात-लवकर ग्रेडसेपरेटरचे काम पूर्ण करावे. ग्रेडसेपरेटरमुळे आजू-बाजूला अपघात होणार नाही. त्याची काळजी घ्यावी. त्यादृष्टीने नियोजन करावे, उपाययोजना कराव्यात. त्रुटी दूर करुन काम तत्काळ पूर्ण करावे, अशा सूचना खासदार बारणे यांनी अधिका-यांना दिल्या.

15 नोव्हेंबरपर्यंत ग्रेडसेपरेटर वाहतुकीसाठी खुला – आयुक्त पाटील

ग्रेडसेपरेटरच्या कामाला गती दिली जाईल. काम तत्काळ पूर्ण केले जाईल. कामात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत. याची दक्षता घेतली जाईल. थेरगावफाटा, गणेशगरकडे जाणा-या रस्त्यावर भविष्यात अपघात होणार नाही. याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या जातील. त्यादृष्टीने उपाययोजना केल्या जातील. 15 नोव्हेंबरपर्यंत ग्रेडसेपरेटर वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे आश्वासन यावेळी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.