Maval News : तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक चार मधील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज – तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक चार मधील निगडे एमआयडीसी येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. 25) वाकडेवाडी येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयावर शेतकरी कृती बचाव समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. तसेच कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी मावळ तालुका यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.

 तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक 4 मधील निगडे एमआयडीसी येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व 32 (1) तत्काळ लागू करून आंबळे येथील 32(1) चे पेमेंट वाटप करावे या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवार (दि 25) वाकडेवाडी येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयावर शेतकरी कृती बचाव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चास भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने पाठिंबा देत सहभागी होऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले.

शासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी आंदोलन स्थळी आंदोलकांची भेट घेऊन सकारात्मक प्रतिसाद देत निवेदन स्वीकारले.

संदेश शिर्के यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी जोपर्यंत शासन शेतकऱ्यांच्या वरील मागण्या मान्य करत नाही तो पर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत व शासनाच्या वतीने प्रांतअधिकारी शिर्के यांनी दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण केले नाही तर याच ठिकाणी येणाऱ्या काळात प्रचंड मोठा जनआक्रोश आंदोलनाला शासनाला सामोरे जावे लागेल असा इशारा या आंदोलनाच्या निमित्ताने देण्यात आला.

याप्रसंगी माजी राज्यमंत्री संजय (बाळा)  भेगडे,प्रभारी भास्कर आप्पा म्हाळसकर, मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर,शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष शांताराम  कदम,गणेश भांगरे,गणेश कल्हाटकर, शंकर  भांगरे यांच्यासह शेतकरी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.