Swarsagar Festival 2022 : मनात रुंजी घालणा-या सुरांनी स्वरसागर महोत्सवाची सुरेल सांगता

एमपीसी न्यूज – चोविसाव्या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाच्या सांगतेच्या दिवशी म्हणजे रविवारी (13 मार्च) सुरुवातीच्या सत्रात पं. नंदकिशोर कपोते यांच्या शिष्यांनी कथ्थक नृत्य सादर केले. भावना सामंत, प्रज्ञा शिंदे, अनुष्का कुलकर्णी, पद्मिनी सोनवणे – भोर, पूजा महाजन, ऋतुजा साळवे, प्राची पाचघरे आणि श्रुती शिरोडकर यांनी कथ्थक नृत्याविष्कार सादर केला. त्यांना पढंत साथ गुरु पं. नंदकिशोर कपोते यांनी स्वत: केली तसेच संवादिनी साथ अक्षय येंडे यांनी व तबला साथ यश त्रिशरण यांनी केली.

पुढील सत्रात दोन युवा गायिकांनी अप्रतिम सहगायन सादर केले. कलेचे माहेरघर मानल्या जाणा-या गोमंतकातील मुग्धा गावकर आणि प्राची जठार यांनी अत्यंत सुंदर आणि सुरेल असे सहगायन केले. स्वरसखी या शीर्षकाखाली सादर झालेल्या या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. या दोघींची गायनशैली वेगवेगळी आहे. त्यांनी वेगवेगळ्या घराण्याची तालीम घेतलेली आहे. पण त्या लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात आपण दोघींनी सहगायन सादर करावे असे आले. जसे दोन भाऊ, दोन बहिणी, गुरुबंधू, गुरुभगिनी सहगायन सादर करतात तसे या दोन सख्यांनी सहगायन सुरु केले. अशा प्रकारचा प्रयोग याआधी झालेला नसल्याने त्याला प्राची आणि मुग्धा यांनी ‘स्वरसखी’ असे अगदी समर्पक नाव दिले.

प्राची आणि मुग्धा यांनी यावेळी राग ‘यमन’ सादर केला. सुरुवातीला ‘मेरो भलो किजो राम’ ही विलंबित एक तालातील बंदिश अत्यंत नेटकेपणाने आणि सहगायनातील सगळा बाज सांभाळत त्यांनी सादर केली. त्यानंतर नवरात्रीतील देवींची नऊ रुपे मांडणारी ‘दुशक्ती विनाशिनी महिषासूरमर्दिनी’ ही मध्य लयीतील आणि झपतालातील सुंदर रचना सादर केली. देवीची नऊ रुपे त्यांनी आपल्या गायनातून श्रोत्यांसमोर सुंदररित्या मांडली.

‘मै वारी वारी जाऊंगी प्रीतमपर’ या द्रुत तीनतालातील पारंपरिक बंदिशीने प्राची आणि मुग्धा यांनी आपल्या या सहगायनाचा समारोप केला. वेगळ्या वळणाने त्यांनी सादर केलेले हे सहगायन रसिकांना खूष करुन गेले. या दोघींना तितकीच समर्पक आणि सुंदर संवादिनी साथ आणखी एका युवा कलावतीने म्हणजे अदिती गराडे हिने केली. आणि दमदार तबला साथ हृषीकेश जगताप याने केली. तानपु-याची साथ शर्मिला शिंदे आणि प्रेरणा दळवी यांनी केली. या सर्व युवा कलाकारांचे आश्वासक गायन वादन रसिकांच्या मनात रुंजी घालून गेले.

यानंतर स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शास्त्रीय गायन, तबला सोलो वादन आणि शास्त्रीय नृत्याच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. शास्त्रीय गायन स्पर्धेत वय वर्षे 10 ते 18 या गटात प्रथम क्रमांक यशश्री जाधव हिला मिळाला आणि दुसरा क्रमांक शौर्य हिर्लेकर याला मिळाला. तसेच 18 ते 35 या गटात प्रथम क्रमांक पल्लवी कैंज हिला मिळाला. तबला सोलो वादन स्पर्धेत वय वर्षे 10 ते 18 या गटात प्रथम क्रमांक अनिश चौधरी याला, दुसरा क्रमांक आरोह कुलकर्णी याला व तिसरा क्रमांक चैतन्य खानेकर याला मिळाला.

तसेच 18 ते 35 या गटात प्रथम क्रमांक रोहित पालकर याला तर दुसरा क्रमांक कैवल्य मुरुडकर याला व तिसरा क्रमांक वरद भणगे याला मिळाला. शास्त्रीय नृत्य स्पर्धेत वय वर्षे 10 ते 18 या गटात प्रथम क्रमांक वर्णिका गौड(कथ्थक) हिला, दुसरा क्रमांक आरुषी नायर(भरतनाट्यम) हिला तर तिसरा क्रमांक रिया रहेजा(कथ्थक) हिला मिळाला. तसेच 18 ते 35 या गटात प्रथम क्रमांक वैष्णवी सपकाळ(कथ्थक), दुसरा क्रमांक स्वराली शेटे(भरतनाट्यम) व तिसरा क्रमांक दर्शनी ठाकूर(कथ्थक) हिला मिळाला. गायन व वादन स्पर्धेचे परीक्षण मिलिंद देशमुख व गंगाधर शिंदे यांनी केले. तसेच नृत्य स्पर्धेचे परीक्षण रोहित चक्रवर्ती व रागिणी कौसडीकर यांनी केले.

यंदा तीन दिवस स्वरसागर महोत्सव रंगला. उत्तरोत्तर रंगत जाणा-या या महोत्सवाची सांगता ज्येष्ठ गायक डॉ. राम देशपांडे यांच्या सुरेल आणि अभ्यासपूर्ण गायनाने झाली. डॉ. देशपांडे यांनी यावेळी जयपूर घराण्याच्या पद्धतीचा राग ‘बिहागडा’ सादर केला. ‘प्यारी पग होले’ हे शब्द असलेली विलंबित तीन तालातील बंदिश सुरुवातीला सादर केली. त्यानंतर द्रुत तीन तालातील ‘रैन दिन कैसे कटे’ ही रचना सादर केली.

डॉ. देशपांडे यांनी आपल्या गायनाचा समारोप संत तुकारामांच्या ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’ या स्वत: स्वरसाज चढवलेल्या अभंगाने केला. त्यांचे जोरकस आणि अभ्यासपूर्ण गायन रसिकांची पसंतीची दाद घेऊन गेले. त्यांना गायनसाथ त्यांचा मुलगा व शिष्य गंधार देशपांडे याने केली. या गायनाला तितकीच सुयोग्य अशी संवादिनीची साथ ज्येष्ठ संवादिनीवादक पं. विश्वनाथ कान्हेरे यांनी केली. दमदार तबला साथ पं. रामदास पळसुले यांनी केली. तानपु-याची साथ अभयसिंह वाघचौरे व अथर्व बुरसे यांनी केली.

या स्वरसागर महोत्सवाला ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. अमरसिंह निकम विशेष उपस्थित होते. या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रतिमा दातार यांनी केले. समारोप प्रवीण तुपे यांनी केला. स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव समितीचे मुख्य संयोजक प्रवीण तुपे आहेत. संजय कांबळे, प्रशांत पाटील, सतीश इंगळे, जवाहर कोटवानी, मलप्पा कस्तुरे, पुरुषोत्तम डबीर, मोहन लोंढे, गजानन चिंचवडे, अस्मिता सावंत, तानाजी ठिगळे, शिरीष कुंभार, मनोज ढेरंगे हे सर्व सदस्य आहेत. तसेच युवा कार्यकारिणीचे प्रमुख शरयूनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संकेत तुपे असून शंतनु देशमुख, संजना देशमुख, केतकी आवटे हे सदस्य आहेत. सांस्कृतिक समितीचा कार्यभार स्मिता देशमुख, सुधाकर चव्हाण, तेजश्री अडिगे, नंदकुमार ढोरे, सुरेखा कुलकर्णी हे सांभाळत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.