Pimpri Crime News : तडीपार गुंडाने दिली पोलिसाला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – तडीपार गुंड तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी शहराच्या हद्दीत आला. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस गेले असता त्याने पोलिसांसोबत झटापट करून पोलिसांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना पिंपरी भाजी मंडई येथे शनिवारी (दि. 8) दुपारी घडली.

सचिन शिवाजी सुर्वे (वय 37, रा. भीमनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. पोलीस हवालदार संपत मच्छिंद्र खाडे यांनी शनिवारी (दि. 8) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपी सुर्वे याला 21 सप्टेंबर 2020 रोजी दोन वर्षाकरिता पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. मात्र तो शासनाची किंवा पोलीस उपायुक्‍तांची कोणतीही परवानगी न घेता शहरात आला.

याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलीस हवालदार खाडे हे त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले. त्यावेळी तो भाजी मंडईजवळ उभा होता. त्याने पोलीस हवालदार खाडे यांची कॉलर पकडून त्यांच्याशी झटापट केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.