Chakan News : दूध डेअरीच्या बॉयलरमधील उकळते पाणी अंगावर पडल्याने चार कामगार भाजले; एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज – दूध डेअरी मधील बॉयलरची सफाई करताना निष्काळजीपणा केल्याने बॉयलरमधील उकळते पाणी कामगारांच्या अंगावर पडले. त्यात चार कामगार गंभीररीत्या भाजले. त्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना 31 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता चिंबळी फाटा येथील सहारा दूध डेअरी येथे घडली.

मुकेश रामलाई कश्यप (वय 30) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. सोनू श्रीप्रभूदयाल कश्यप (वय 26), राहुल संतोष कुमार माथूर (वय 18), इसाक अकबर कोतवाल (वय 45, सर्व रा. चिंबळी फाटा, ता. खेड) अशी जखमींची नावे आहेत.

याप्रकरणी ऑपरेटर अब्दुल गफार अब्दुल रशीद मुल्ला (वय 44, रा. कलागोडवस्ती, धानोरी, पुणे), मॅनेजर मोहितकुमार राजबहादूर सिंग (वय 55, रा. कुरुळी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुल्ला हा सहारा दूध डेअरी मध्ये बॉयलर ऑपरेटर म्हणून काम करतो. बॉयलर ऑपरेटर आणि मॅनेजर हे दूध डेअरी मधील बॉयलर साफ करून घेत होते. त्यावेळी त्यांनी बॉयलर शेजारी थांबलेल्या कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही. बॉयलरच्या टाकीतील पाण्यात लापरवाहीने नेहमीपेक्षा जास्त डिस्क्लीनर नावाचे केमिकल टाकले.

दरम्यान बॉयलरच्या टाकीचे झाकण उघडे ठेवले यामुळे बॉयलर मधील पाणी जास्त गरम झाले. पाण्याचा दाब वाढला आणि उकळते पाणी शेजारी थांबलेल्या कामगारांच्या अंगावर पडले. यात चार कामगारांच्या हाताला, पायाला, पोटाला, पाठीला, चेह-यावर ठिकठिकाणी गंभीररीत्या भाजले.

चारही जखमी कामगारांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र 7 जानेवारी रोजी जखमी कामगार मुकेश कश्यप याचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.