Talegaon Dabhade: परदेशातून आलेल्या नागरिकांसाठी इंद्रायणी महाविद्यालयाच्या आवारात ‘विलगीकरण कक्ष’

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना पूरक ठरेल आणि आपत्कालीन परिस्थितीत घराऐवजी स्वतंत्र ‘विलगीकरण कक्ष’ असावा म्हणून इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेने इंद्रायणी महाविद्यालयाच्या आवारातील मुलींचे वसतिगृह उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांनी ‘एमपीसी न्यूज’ला दिली.

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तळेगाव मधील जनरल हॉस्पिटल व इतर दवाखान्यांमध्ये सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत. जर येणाऱ्या काळात जागेची आवश्यकता भासली तर अशा आपत्कालीन परिस्थितीत  इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेतर्फे  ‘विलगीकरण कक्षासाठी मुलींचे वसतिगृह उपलब्ध करून देणाची तयारी दर्शविली आहे.

इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयामध्ये सत्तर मुलींची निवासाची सोय असणारे वसतिगृह आहे. सध्या सुट्ट्यांमध्ये मुली घरी गेल्या आहेत. त्यामुळे सदरचे वसतिगृह रिकामेच आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत विलगीकरण कक्ष म्हणून वापरास देण्याबाबत संस्थेच्या नियामक मंडळाने हा निर्णय घेतला आहे.तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्याकडे सदरचे वसतिगृहाचा ताबा विलगीकरण कक्ष म्हणून देण्यात आला आहे.

यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार  कृष्णराव भेगडे यांनी सांगितले की, आम्ही सामाजिक दातृत्वाच्या  भावनेतून विलगीकरण कक्षासाठी  इंद्रायणी महाविद्यालयाचे वसतिगृह दिले आहे. संस्थेने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

विलगीकरण कक्षाची सुविधा मोफत – रामदास काकडे

नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि गरज पडली तर विलगीकरण कक्षाची जागा मोफत उपलब्ध करून देत आहोत. आणि यासंदर्भात डाॅक्टरांशी संपर्क साधून मदत उपलब्ध करुन घेता येईल, असे रामदास काकडे यांनी सांगितले.

रुग्णालयात दाखल होऊ न इच्छिणाऱ्यांना  विलगीकरण कक्ष उपयुक्त राहील, असे मत मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी व्यक्त केले. परदेशगमन करून आलेले, मात्र कोरोना विषाणूने बाधित न झालेल्या नागरिकांना आपण 14 दिवस घरीच राहण्याच्या सूचना देतो. कोरोना विषाणूने बाधित नसल्याने ते रुग्णालयात दाखल होण्यास टाळाटाळ करतात. त्यासाठी हा विलगीकरण कक्ष आहे. यामध्ये मुलभूत गरजांची सोय करण्यात येईल. असे झिंजाड यांनी सागितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.