Talegaon Dabhade: पोटनिवडणूक लढविण्यासाठी ‘राष्ट्रवादी’कडून दहाजण इच्छुक; उद्या होणार मुलाखती

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे परिषदेतील प्रभाग क्रमांक एक ‘ब’चे भाजप नगरसेवक संदीप शेळके यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी सहा फेब्रुवारीला निवडणूक प्रक्रिया होणार आहे. या जागेवरून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या दहा जणांचे अर्ज पक्षाकडे आले आहेत. या इच्छुकांच्या उद्या (सोमवारी) मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक गणेश काकडे यांनी दिली. सायंकाळी साडेचार वाजता जनसंपर्क कार्यालयात मुलाखती होणार आहेत.

विधानसभा निवडणुकी दरम्यान सुनील शेळके यांच्या पाठोपाठ त्यांचे चुलतबंधू संदीप शेळके यांनी देखील भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाले आहेत. त्यांच्या रिक्त जागेवर नुकतेच झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात ‘ब’मधून तळेगाव जनसेवा विकास समिती तसेच शहर सुधारणा व विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार संगीता राजेंद्र शेळके या 795 मतांनी विजयी झाल्या आहेत.

संदीप शेळके यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी सहा फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश काकडे यांनी केले होते. त्यानुसार अनिकेत भेगडे, संदीप शेळके, निरंजन जहगीरदार, कल्पेश भगत, सागर खांडगे, संविद पाटील, राजेंद्र काटे, आशिष खांडगे, करण शेळके, जगदीश कोराड या दहा जणांचे अर्ज पक्षाकडे आले आहेत. त्यांच्या उद्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. काकडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात साडेचार वाजता मुलाखती होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.