Talegaon : बेकायदेशीर मांस वाहतूक केल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाक्यावर चार टन मांस पकडले. हे मांस संगमनेर येथून घाटकोपर मुंबई येथे नेण्यात येत होते. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई आज (रविवारी) पहाटे एकच्या सुमारास करण्यात आली.

शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय 25, रा. रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर) यांनी याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. समीर हुसेन शेख (वय 32, रा. जुन्नर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवशंकर यांना माहिती मिळाली की, कसाई मोहल्ला संगमनेर येथून गोमांस भरलेला एक टेम्पो (एम एच 17 / बी वाय 0922) मुंबईच्या दिशेने जात आहे. त्यानुसार ते त्यांचे मित्र शिवांकुर खैर, सचिन जवळगे, गौरव पाटील यांच्यासह उर्से टोलनाक्यावर थांबले. रविवारी पहाटे एकच्या सुमारास एक ट्रक उर्से टोलनाक्यावर आला. त्याला शिवशंकर आणि त्यांच्या मित्रांनी तो टेम्पो बाजूला घेण्यास सांगितले. टेम्पोमध्ये दोघेजण होते. त्यातील एकाला टेम्पोमध्ये काय आहे, याबाबत विचारले असता त्याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना धक्काबुक्की करून तिथून पळ काढला.

दरम्यान फिर्यादी यांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करून पोलीस मदत मागवली. टेम्पो चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तळेगाव पोलीस घटनास्थळी आल्यानंतर टेम्पो चालकाने टेम्पोत मांस असल्याचे सांगितले. त्याच्याकडे त्याबाबत परवाना असल्याची चौकशी केली असता तो बेकायदेशीरपणे मांस वाहतूक करत असल्याचे समजले. पोलिसांनी टेम्पो पोलीस ठाण्यात आणून पंचासमक्ष टेम्पोची पाहणी केली असता टेम्पोत सुमारे चार ते पाच टन जनावरांचे मांस आढळून आले. टेम्पोमधील काही मांस रासायनिक विश्लेषणासाठी काढून नेण्यात आले आहे. पोलिसांनी टेम्पोसह 15 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.