Pimpri News : कलाकार हा समाजाचं देणं फेडण्यासाठी जन्माला आलेला असतो – प्रवीण तरडे

एमपीसी न्यूज – कलाकार हा समाजाचं देणं फेडण्यासाठी जन्माला आलेला असतो. त्याने समाजाचं देणं फेडलंच पाहिजे, असे प्रतिपादन “सरसेनापती हंबीरराव” या चित्रपटाचे दिग्दर्शक व मुख्य कलाकार प्रविण तरडे यांनी केले. सोमवारी पिंपरीत पत्रकारांशी संवाद साधताना प्रविण तरडे बोलत होते. यावेळी कलाकार रमेश परदेशी, सुनील अभ्यंकर आदी उपस्थित होते.

यावेळी तरडे म्हणाले की, मराठी चित्रपटात यापूर्वी नटाला कधी एन्ट्री अशी मिळालीच नाही. पण हंबीरराव मध्ये एन्ट्रीलाच टाळ्या, शिट्या मिळत आहेत. या चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे भव्यता आणि दिव्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सरसेनापती करण्यासाठी अनेक अभिनेते शोधले, पण प्रत्येकात काहीतरी उणिवा जाणवत होत्या. यानंतर निर्मात्यांनी माझ्या नावाला पसंती दिल्यावर मी प्रयत्नपूर्वक एक वर्षात 98 किलो वरून 76 किलो पर्यंत वजन घटवले.

घोडेस्वारी, तलवारबाजी शिकलो, शरीरयष्टी कमवली. व्यक्तिमत्व साकार करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळे हंबीरराव साकारता आला. या चित्रपटात हंबीरराव बरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सोयराबाई या सर्वांच्या भूमिका उत्कृष्ट झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने या महाचित्रपटाला उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे भव्यता आणि दिव्यता आहे. एकाच टाईपचा सिनेमा पुन्हा कधी साकारायचा नाही, हे मी मनाशी पक्के केले आहे.

त्यामुळे मुळशी पॅटर्न नंतर अनेक निर्मात्यांची मागणी असतानाही त्या पद्धतीचा चित्रपट मी परत केला नाही, त्यानंतर देखील अनेक निर्माते माझ्याकडे आले. पुन्हा तेच विषय करायचे नाही. कोणत्याही मोहाला बळी पडायचे नाही आणि कुठलेतरी अवॉर्ड मिळवण्यासाठी सिनेमा करायचा नाही. माझ्या दृष्टीने सिनेमा हा व्यवसाय यशस्वी झाला पाहिजे. खूप लोकांनी पाहिला पाहिजे. चित्रपट बनवतानाच मी वेगळे आणि भव्य विषय घेऊन चित्रपट बनवला. त्यामुळे मला प्राईम टाईमसाठी कधी झगडावे लागले नाही.

उलट मोठ्या कलाकारांचे चित्रपट उतरुन माझा चित्रपट लावण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत. मी व्यवसायाने शेतकरी आहे. त्यामुळे माझ्या प्रत्येक चित्रपटात शेती हा विषय घेतला आहे. सिनेमा ही माझी आवड आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या कार्यकालात सरसेनापतीपद भूषविणाऱ्या हंबीरराव मोहिते यांचा इतिहास म्हणजे मराठ्यांचा इतिहास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

सेनापती हंबीरराव यांच्या सारखी नररत्ने समजून घ्यायची असतील, तर महाराष्ट्रातील प्रत्येक आबालवृद्धांनी हा चित्रपट आवर्जून पाहिला पाहिजे, असे आवाहन प्रविण तरडे यांनी केले, असे आवाहन प्रविण तरडे यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.