Nere News : तान्हुले बछडे पुन्हा विसावले आईच्या कुशीत, पुनर्भेटीचे क्षण कॅमे-यात कैद 

एमपीसी न्यूज – मुळशी येथील नेरे गावात बिबट्याचे तीन बछडे सोमवारी (दि.24) आढळून आले. उसाच्या फडात ऊसतोड कामगाराला हे बछडे सापडले. बछड्यांची तपासणी करून त्यांना पुन्हा त्याच जागी सोडण्यात आले. दोन दिवसांनंतर तान्हुले बछडे आणि त्यांच्या आईची पुनर्भेट झाली आहे. आई आपल्या बछड्यांना भेटल्यानंतर त्यांना घेऊन जातानाचे क्षण कॅमे-यात कैद झाले आहेत. 

बुधवारी (दि.26) रात्री साडे सातच्या सुमारास बछड्यांची आई त्या ठिकाणी आली व आपल्या बछड्यांना घेऊन गेली. यामध्ये एक नर व दोन मादी बछडे आहेत. सोमवारी बछडे आढळून आल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व रेस्क्यु सीटी वाइल्डलाइफ टीम घटनास्थळी दाखल झाली व बछड्यांना ताब्यात घेतले होते. त्याच दिवशी बछड्यांची तपासणी करून त्याच जागेवरती ठेवण्यात आले होते. पण, आवाजाच्या अडथळ्यांमुळे बछडे आणि आईची पुनर्भेट झाली नाही.

दुसऱ्या दिवशी मात्र आईने त्या जागेवर येऊन आपल्या बछड्यांना जवळ केले व सोबत घेऊन गेली. आई व बछड्यांची पुनर्भेट कॅमे-यात कैद करण्यासाठी एक टिम घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आली होती. आईच्या प्रत्येक हलाचालीवर दूरवर ठेवलेल्या कॅमे-याच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जातं होतं. पहिल्या दिवशी जवळच्या गावात फटाके फोडले जात होते तसेच वेगवेगळ्या निर्माण होणा-या आवाजामुळे बछडे व आईची पुनर्भेट होऊ शकली नव्हती. अखेर बुधवारी तान्हुले बछडे पुन्हा आपल्या आईच्या कुशीत विसावले.

बछडे 15 ते 20 दिवसांचे असल्याने त्यांना आईच्या प्रेमाची गरज आहे हे ओळखून वन विभाग व रेस्क्यु टिमच्या मदतीने त्यांची पुनर्भेट घडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. शेतकरी मोहन जाधव यांच्या उसाच्या फडात हे बछडे आढळून आले होते, त्यांनी देखील बछड्यांच्या पुनर्भेटीसाठी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.