Maval News : सोमाटणे टोलनाका हटविण्यासाठी न्यायालयीन लढा सुरु

एमपीसी न्यूज – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर असलेला सोमाटणे टोलनाका हटविण्याची मागणी मावळ परिसरातील नागरिक आणि सर्वपक्षीय पदाधिकारी करीत आहेत. मात्र हा टोलनाका हटविण्यात येत नसल्याने हा वाद न्यायालयात गेला आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल भांगरे, सुनील पवार, डॉ. अभिषेक हरिदास यांनी आयआरबी, एमआरडीसी आणि इतर यांच्या विरोधात वडगाव मावळ न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर 2 मे रोजी युक्तिवाद झाला असून याचिकाकर्त्यांच्या बाजूने याप्रकरणी युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला आहे.

पुणे मुंबई मार्गावर लोकांची वर्षानुवर्षे लूट सुरू आहे मात्र यात मोठमोठ्या नेत्यांचे व अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याने या विरोधात कोणतीही कारवाई आज-तागायत झालेली दिसून आली नाही. अनेक वेळा संघटना व राजकीय पक्षांनी आंदोलने केली मात्र उपयोग काहीच नाही. पुणे ते मुंबई टोल नाक्यावर नागरिकांची वर्षानुवर्षे फक्त लूट सुरू असून एम. एस. आर.डी. सी अधिकारी तक्रारीवर कोणतीही कारवाई करत नाही अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली.

केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या यादीत पुणे मुंबई महामार्गावरील टोल नाका देहू रोडला दाखवण्यात आला असून तो वास्तविक सोमाटणे म्हणजेच तळेगाव दाभाडे हद्दीत आहे. तसेच दोन टोल नाक्यातील अंतर हे 60 किलोमीटर असावे असा नियम असतांनाही या नियमा कडे रीतसर दुर्लक्ष करून नाहक टोल घेतला जात आहे.

तळेगाव दाभाडे, वडगाव, लोणावळा येथील रहिवासी, व्यापारी यांनी असे स्पष्ट केले की  नियमित वाहतुकीसाठी आम्हाला दुसरा मार्ग नसून फक्त सोमाटणे फाट्या वरील टोल भरूनच आम्हाला पुण्याला जावे लागते मात्र नियमानुसार स्थानिक वाहतुकीस 25% टोल घ्यावा व लोकल कमर्शियल वाहतुकीस 50% टोल घ्यावा हे स्पष्ट असतानाही सोमाटणे फाट्या वरती 100% टोल वसूल केला जात आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना नाहक भृदंड व टोल कॉन्ट्रॅक्टर यांना गैरकानुनी  लाभ होत आहे.

या बाबत वस्तुस्थिती तपासून तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता अनिल भांगरे, आयु.सुनील पवार, सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभिषेक हरिदास यांनी आय.आर.बी, एम.आर.डी .सी व इतर विरोधात वडगाव मावळ न्यायालयात सी.आर.पी.सी 39 अंतर्गत भा.द.वी कलम 409 खाली याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेत न्यायालयाने सूनवाईचे आदेश दिल्याने डॉ अभिषेक हरिदास व अनिल भांगरे यांनी  दि 02 मे रोजी युक्तिवाद केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.