Pune News : पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन 4 ते 6 एप्रिलला होणार कोल्हापूरमध्ये

एमपीसी न्यूज – विश्वात्मक संत साहित्य परिषद, पुणे आणि अमरवाणी इव्हेंट्स फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन येत्या 4 ते 6 एप्रिल 2022 या कालावधीत कोल्हापूर येथे होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन 5 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे. भारत सरकारच्या कंपनी लवादाचे सदस्य ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. डॉ. मदन महाराज गोसावी हे संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. ज्येष्ठ विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.

संमेलनाध्यक्ष डॉ. मदन महाराज गोसावी, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे, प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, डॉ. रंगनाथ नाईकडे, मोहन तिवारी, शिरीष चिटणीस यांनी आज (शनिवारी) पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत संमेलनाविषयी माहिती दिली.

उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे आदी उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या पहिल्या दिवशी 4 एप्रिल रोजी अदमापूर येथे संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. रामचंद्र देखणे यांच्या उपस्थितीत संत बाळूमामा यांच्या समाधीची पूजा करुन सायंकाळी दिंडी, कीर्तन, भजन, भारूड व भक्तीसंगीताचा कार्यक्रम होणार आहे.

मारुती महाराज कुरेकर यांना ‘संत शिरोमणी पुरस्कार’, तसेच विश्वात्मक संत साहित्य संमेलनातर्फे हरिद्वारचे महंत ऋषीश्वरानंदजी यांना ‘विश्वात्मक संत जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात येणार आहे. ‘उजळावया आलो वाटा’ या ग्रंथरूप स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. संमेलनात 5 आणि 6 एप्रिल रोजी ‘संत साहित्य आणि पर्यावरण’, ‘संत साहित्य आणि लोकतत्त्व’, ‘अस्वस्थ वर्तमानात संत विचारांची भूमिका’ या विषयावर परिसंवाद होतील. तसेच ‘भक्ती वसा की व्यवसाय’ या विषयावर माजी आमदार उल्हास पवार यांच्या संचलनात महाचर्चा होणार आहे.

यामध्ये महामंडलेश्वर द्वाराचार्य श्री रामकृष्ण महाराज लहवितकर, महानुभव साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक बा. भो. शास्त्री, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या धर्मशास्त्राच्या अभ्यासक अंशुलजी बाफना, मनःशांती केंद्राचे डॉ. प्रमोद शिंदे, पत्रकार विजय बावीस्कर आणि पंकज महाराज गावडे हे उपस्थित राहणार आहेत. भक्तिसंप्रदाय आणि विश्वात्मकता या परिसंवादात विविध पंथ, संप्रदायांवर विचारमंथन होणार आहे.

संमेलनाच्या समारोपाला माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री जिश्नूदेव वर्मा, काशी सुमेरू पीठ वाराणसीचे जगद्गुरू शंकराचार्य स्वामी नरेन्द्रानन्द सरस्वती महाराज, कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू दिगंबर शिर्के उपस्थित राहणार आहेत.

यासह पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपुर, भारत सरकार यांच्यातर्फे संमेलन अंतर्गत भक्तीसंगीत महोत्सव होणार असून, त्यात चंदाबाई तिवाडी व शेखर भाकरे यांचे भारुड, निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे अभिनय प्रशिक्षक योगेश चिकटगावकर यांचा जागरण-गोंधळ सादर होणार आहे.

गुजरातमधील डायरो गायन, राजस्थानमधील भपंग, कबीरवाणी आणि लांगा गायन, तेलंगणातील हरिकथा, छत्तीसगडमधील पंडवानी असे भक्तिसंगीताचे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपुर (भारत सरकार) यांच्या निदेशिका किरण सोनी गुप्ता या उपस्थित असणार आहेत.

शंतनु हिर्लेकर आणि उपग्ना पंड्या यांचे भजन आणि सुखदा खांडगे यांचे पांडुरंगाष्टक ‘अवचिता परिमळू’ ही विरहिणी सादर होणार आहे. विश्वात्मक संत साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी ऍड. अक्षय गोसावी, उपाध्यक्ष ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, कार्यवाहक मुख्य वनाधिकारी रंगनाथ नाईकडे, मानसिंग किल्लेदार, ह.भ.प. शिवाजीराव बागवेकर, बी.डी. कुलकर्णी, बाळासाहेब काशीद, प्रा. डॉ. वर्षा तोडमल, रमेश शिंदे, न्यायाधीश दिलीप घुमरे, गोपीचंद कदम, गणेश वाडेकर, आनंद गायकवाड व शिरीष चिटणीस, कार्यक्रमाचे निमंत्रक जगन्नाथ (बाबा) पाटील व संकेत खरपुडे हे परिश्रम घेत आहेत.

संत साहित्याच्या अभ्यासकांनी, विचारवंतानी आणि सर्व नागरिकांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक संस्था अमरवाणी इव्हेंट्स फौंडेशनचे संचालक रवी पाटील, संचालक मोहन गोस्वामी (तिवारी) आणि विश्वात्मक संत साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.