Hinjawadi News : आता पार्सल माघारी जाण्याची चिंता नको, हिंजवडीत पोस्टाची विभागातील पहिली ‘अनवित’ सुविधा सुरू

एमपीसी न्यूज – पोस्टाने आलेलं पार्सल, महत्त्वाची पत्रं किंवा कागदपत्रे घरी आले आणि आपण घरी नसल्यास ती परत जातात. अशा वेळी ती परत मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यावर तोडगा म्हणून भारतीय पोस्ट विभागाने ‘अनवित’ इंटेलिजन्ट पार्सल डिलिव्हरी सिस्टीम सुरू केली आहे. यामुळे संबंधित व्यक्ती घरी नसल्यास ते पार्सल सहा दिवस ‘अनिवत’ मध्ये ठेवले जाईल आणि या कालावधीत ती व्यक्ती आपले पार्सल घेऊन जाऊ शकते.

हिंजवडी येथील इन्फोटेक पोस्ट कार्यालयात आज (सोमवार, दि.29) पुणे विभागाच्या पोस्टमास्टर जनरल, मधुमीता दास यांच्या हस्ते ‘अनवित’ सुविधेचा शुभारंभ झाला. यावेळी हिंजवडी सरपंच साखरे, पोस्टातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पुणे विभागात सुरू होणारी ही पहिली इंटेलिजन्ट पार्सल डिलिव्हरी सिस्टीम आहे. तर, नवी मुंबई, ठाणे नंतर महाष्ट्रातील तिसरी आहे.

‘अनवित’ इंटेलिजन्ट पार्सल डिलिव्हरी सिस्टीम बाबत माहिती देताना मधुमीता दास म्हणाल्या, दिवसेंदिवस नागरिक स्मार्ट होताहेत तसेच आता पोस्ट डिलिव्हरी सिस्टीम देखील स्मार्ट होत आहे. सुरवातीला संबंधित पत्यावर कुणी हजर नसल्यास पार्सल माघारी जात होते. आता या सिस्टीम द्वारे पार्सल घ्यायला घरी कुणी नसल्यास त्याचे पार्सल ‘अनवित’ मध्ये ठेवले जाईल व त्याबाबत संबंधित व्यक्तीला फोनद्वारे कळविले जाईल. सहा दिवसांत केव्हाही येऊन तो व्यक्ती आपला मोबाईल नंबर आणि त्यावर येणाऱ्या ओटीपी द्वारे आपले पार्सल घेऊ शकतो. हिंजवडी मध्ये 15 हजार घरे असून त्यांना याचा लाभ होईल,’ असे दास यांनी नमूद केले.

याशिवाय पोस्टाने ‘माय स्टॅम्प’ नावाची आणखी एक खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये कोणत्याही सामान्य नागरिकाला आपला स्वतःचा स्टॅम्प पोस्टातून तयार करून घेता येईल. 300 रुपयांत 12 स्टॅम्प मिळतात आणि अवघ्या दहा मिनिटात नागरिकांना ते मिळू शकतात.

स्टॅम्प निर्माण करण्याचा अधिकार पोस्टाला आहे, सामान्य नागरिकांना आठवण म्हणून तसेच एखाद्याला भेट म्हणून देण्यासाठी ‘माय स्टॅम्प’ सुविधा पोस्ट देत आहे. सुकन्या योजना सारख्या विविध योजना सामान्य नागरिकांच्या हितासाठी भारत सरकारने उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन दास यांनी यावेळी केले.

आगामी काळात रेल्वे तिकीट बुकिंग देखील तुमच्या नजीकच्या पोस्ट कार्यालयातून करता येईल, यासाठी पोस्टाचे प्रयत्न सुरू आहेत. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता दास यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.