Rajesh Patil : तृतीयपंथीयांनी सुरक्षारक्षक, ग्रीन मार्शलची जबाबदारी यशस्वीपणे निभावल्यास चळवळ अनुकरणीय ठरेल – आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – तृतीयपंथी घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घेत असताना आव्हानांचा सामना करत त्यांनी धाडसाने टाकलेले पाऊल पथदर्शक चळवळ उभी (Rajesh Patil) करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. सुरक्षारक्षक आणि ग्रीन मार्शल म्हणून सोपवलेली जबाबदारी तृतीयपंथीयांनी यशस्वीपणे निभावल्यास ही चळवळ इतरांसाठी अनुकरणीय ठरेल असा विश्वास महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी व्यक्त केला.

तृतीयपंथी घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेने तृतीयपंथी पुनर्वसन कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत तृतीयपंथीयांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यानुसार तृतीयपंथीयांची कंत्राटी तत्वावर सुरक्षारक्षक आणि ग्रीन मार्शल म्हणून खाजगी संस्थेमार्फत महापालिका सेवेसाठी नेमणूक करण्यात आली आहे. या नेमणुकीचे पत्र आज महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते या तृतीयपंथीयांना देण्यात आले. त्यानिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी आयुक्त पाटील (Rajesh Patil) बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल रॉय, उपआयुक्त रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, प्रभारी आरोग्य निरीक्षक उमेश जाधव, पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब आढारी, ग्रीन मार्शल आणि सुरक्षारक्षक पथकात नियुक्ती करण्यात आलेले तृतीयपंथी कर्मचारी अनुष्का जाधव, नयना कोटगीर, झोया शिरोळे, तुषार वाडीले, आतिष तुपे, वैशाली मराठे, मिहिका वर्मा , प्रशांत अडकने, रूपा टाकसाळ, साझ प्रसादसिंग, निकिता मुख्यदल, पूजा पवार, संजू काठे, प्रमित पवार, शायना रॉय, सचिन देशपांडे उपस्थित होते.

उपस्थित तृतीयपंथी कर्मचा-यांसमवेत संवाद साधताना आयुक्त पाटील म्हणाले, मुख्य प्रवाहात येण्यासाठी महापालिकेने देऊ केलेल्या नोकरीचा स्वीकार करून तृतीयपंथीयांनी धाडसी पाऊल उचलले आहे. उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खूप आव्हाने उभी असतात. तृतीयपंथीयांनी स्वावलंबी जीवन जगण्यासाठी हे आव्हान स्विकारले हेच खूप महत्त्वाचे आहे. आजचा दिवस सर्वांसाठी संस्मरणीय असून ग्रीन मार्शल आणि सुरक्षारक्षक पथकात नियुक्ती करण्यात आलेल्या तृतीयपंथीयांची यशोगाथा प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या जीवनात आलेला सकारात्मक बदल आणि केलेली यशस्वी वाटचाल इतरांसाठी अनुकरणीय असणार आहे. ही एक चळवळ निर्माण झाली आहे. पथदर्शक म्हणून आपण या चळवळीमध्ये आपले कर्तव्य बजावणार आहोत, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. भविष्यात शासकीय स्थायी आस्थापनेमध्ये देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक अडथळे येतील, ते पार करण्याची हिंमत ठेवा. महापालिकेची यंत्रणा सदैव तुमच्या पाठीशी उभी असेल.

आपल्याला हा पथदर्शी उपक्रम यशस्वी (Rajesh Patil) करायचा आहे. भविष्यात या उपक्रमामुळे खूप सकारात्मक गोष्टी घडण्यास चालना मिळणार आहे. हा मोठा निर्णय असून ही महत्वाची चळवळ देखील आहे. लोकांनी तुमच्याबद्दल लिहिले, बोलले पाहिजे असे चांगले काम करून महापालिकेचा विश्वास सार्थ ठरवावा. आपल्या कामातून समाजामध्ये वेगळी ओळ्ख निर्माण होणार असून आपण समाजासमोर नवीन आदर्श निर्माण करा, असे आयुक्त पाटील यावेळी म्हणाले. नवनियुक्त तृतीयपंथी कर्मचा-यांना पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी आयुक्त पाटील यांनी शुभेच्छाही दिल्या.

तृतीयपंथीयांना महापालिकेचे सुरक्षारक्षक आणि ग्रीन मार्शल पथकात काम करण्याची संधी मिळालेल्या तृतीयपंथी कर्मचा-यांनी भावूक होत आपले मनोगत व्यक्त केले. नवनियुक्त सुरक्षारक्षक निकिता मुख्यदल म्हणाल्या, अपमान आणि अवहेलनेचे जीवन जगण्यापेक्षा स्वाभिमानी जीवन जगावे असे आम्हाला सतत वाटत होते. आम्हाला समाजाने नाकारले पण महापालिकेने आधार दिला, आमच्यावर विश्वास ठेवला. या मदतीच्या हातामुळे आम्हाला जगण्याची उभारी आली. महापालिकेने आम्हाला दिलेला हा सन्मान असून आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही कटीबद्ध राहू.

ग्रीन मार्शल पथकात नियुक्ती झालेल्या प्रेम लोटलीकर यांनी ट्रान्समेनच्या व्यथा आणि अडचणी यावेळी विशद केल्या. ते म्हणाले, ट्रान्समेनचे प्रमाणपत्र सहजतेने मिळत नाही. अनेक आस्थापना नोकरी देखील देत नाहीत. भिकही मागता येत नाही. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत महापालिकेने आमच्या व्यथा समजून घेऊन महापालिकेच्या ग्रीन मार्शल पथकात काम करण्याची आम्हाला संधी दिली. महापालिकेने दिलेला हा सन्मानाचा हात आम्ही कधीही विसरू शकत नाही.

सुरक्षारक्षक रूपा टाकसाळ म्हणाल्या, आम्ही घर सोडल्या नंतर आमच्या वाट्याला चांगले जगणे येणार नाही असे वाटले होते, आयुष्यभर अपमान सहन करावा लागणार याच भावनेतून आम्ही आयुष्य जगत होतो. सन्मानाचे जीवन हे आमच्यासाठी स्वप्न होते. हे स्वप्न महापालिकेने प्रत्यक्षात साकार केले असून या सन्मानाबद्दल आम्ही ऋणी आहोत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले तर आभार पोर्णिमा भोर यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.