Chinchwad News : वर्षाभरात शहरात 54 ठिकाणी दरोडे मागील वर्षीच्या तुलनेत दरोड्यांचे प्रमाण दुपटीहून अधिक

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात जानेवारी ते डिसेंबर 2021 या वर्षभरात 54 ठिकाणी दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. दरोड्याच्या सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल दुपटीहून अधिक आहे. मागील वर्षी (सन 2020) 24 दरोड्याच्या घटना घडल्या होत्या.

शहरात वाहन चोऱ्या, सोनसाखळी चो-या, मोबाईल हिसकावणे, वाहनचो-या यांसारख्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यातूनच पुढे दरोडे देखील टाकण्यास हे गुन्हेगार मागेपुढे पाहत नाहीत. काही जणांचे टोळके मिळून दरोडा टाकतात. अनेक वेळेला हे गुन्हेगार शस्त्रांचाही वापर करतात. व्यावसायिक दरोड्यांचे प्रमाण शहरात कमी आहे. एकूण 54 दरोड्यांपैकी वर्षभरात 13 व्यावसायिक दरोडे तर 41 तांत्रिक दरोडे झाले आहेत. विशेष म्हणजे दरोड्याचे सर्व गुन्हे गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती धाक दाखवून, मारहाण करून अथवा गंभीर जखमी करून जबरदस्तीने चोरी करतात, तेंव्हा दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात येतो. याला दरोडा अथवा व्यावसायिक दरोडा म्हटले जाते. तसेच भांडण सुरू असेल आणि भांडणा-या, मारहाण करणाऱ्या व्यक्तींमध्ये पाच अथवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असेल त्यांनी जबरदस्तीने चोरी करण्याचा प्रयत्न केल्यास देखील दरोड्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात येतो. याला तांत्रिक दरोडा असेही म्हटले जाते.

दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी चोरट्यांचा डाव उधळून लावण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. या तिन्ही घटनेतील आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चोरीची भूक वाढल्याने तसेच परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी चोरटे दरोडे घालतात. मागील वर्षी दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये चार गुन्हे उशिरा दाखल करण्यात आले आहेत.

वर्षभरातील दरोड्याच्या घटना –

जानेवारी – 5
फेब्रुवारी – 6
मार्च – 7
एप्रिल – 0
मे – 2
जून – 5
जुलै – 4
ऑगस्ट – 6
सप्टेंबर – 2
ऑक्टोबर – 4
नोव्हेंबर – 5
डिसेंबर – 4

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.