Pune News : परदेशी शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती लाभार्थ्यांची संख्या 200 करावी; युवक कॉँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – परदेशात शिक्षण घेण्यास जाण्यासाठी अनुसूचित जातीच्या मुलामुलींना दिली जाणारी शिष्यवृत्ती त्वरित वितरित करावी, तसेच शिष्यवृत्ती धारकांची संख्या 75 वरून 200 करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रथमेश आबनावे यांनी राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेशात, तसेच व्हिसा मिळवण्यात अडचणी येत असल्याने यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आबनावे यांनी दिला.विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी सदर प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावी आणि योजनेचा भाग असलेले आगाऊ खर्च (ॲडव्हान्सेस), विमान शुल्क मिळावे, असेही या निवेदनात म्हटले आहे. सहआयुक्त भारत केंद्रे आणि इतर अधिकाऱ्यांशीही त्यांनी याबाबत चर्चा केली.

निवेदनात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळाली नाही, तर त्यांच्या प्रवेशाला अडचणी येत आहेत.एकप्रकारे शिक्षणाची संधी डावलण्याचाच हा प्रकार आहे. ही प्रक्रिया अधिक गतिमान होण्यासाठी, तसेच लोकाभिमुख आणि जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करून यासंदर्भात जनजागृती करावी.त्यातील क्लिष्ट अटी काढून ती अधिक सुलभ व पारदर्शक करावी.विद्यार्थी – पालकांना योग्यप्रकारे मार्गदर्शन व संवाद करावा, ऑनलाईन वेबपोर्टलमार्फत अर्ज मागवणे तसेच यासंदर्भातली ऑनलाईन पद्धतीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.