Pune District News : चोरीला गेलेले डोक्याचे ‘केस’ दीड वर्षांनी परत मिळाले

एमपीसी न्यूज : चोरीला गेलेले केस तब्बल दीड वर्षांनी परत मिळाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावातील ही घटना आहे. दीड वर्षापूर्वी एका दुचाकी चालकाला आडवून त्याच्याकडील पन्नास किलो मानवी डोक्याच्या केसांची चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी महेश निंबाळकर (रा.शेळगाव ता.इंदापूर ) यांनी फिर्याद दिली होती. वालचंदनगर पोलिसांनी तपास करून चोरीस गेलेल्या मालापैकी १ लाख ९० हजार रुपये रोख व १२ किलो केस निंबाळकर यांना परत केले आहेत.

फिर्यादी हे गावोगावी फिरून केसावरती भांडी विक्रीचा व्यवसाय करतात. मागील वर्षी १८ जुलै रोजी निंबाळकर हे इंदापूर- बारामती रस्त्याने ५० किलो केस घेऊन बारामतीकडे विक्रीसाठी निघाले होते. मात्र, सकाळी नऊच्या सुमारास लासुर्णे येथील चिखली फाटा येथे निंबाळकर यांना अनोळखी चोरांनी अडवत दमदाटी करुन ५० किलो केस लंपास केले होते.

वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व प्रकाश माने यांनी सदर घटनेचा तपास करून त्या अनोळखी चोरांचा शोध घेतला. तपासाअंती पोलिसांनी मयूर उर्फ जुल्या मोहन पाटोळे (रा. निमगाव केतकी), शंकर उमाजी बोडरे (रा.फोंडशिरस ता. माळशिरस), विजय मल्हारी जाधव (रा. धर्मपूरी, ता.माळशिरस), सुनिल उर्फ सोन्या तायाप्पा शिंदे व लक्ष्मण मारुती वाघमोडे (रा. दोघे, शेळगाव) अशा सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून १२ किलो केस व १ लाख ९० हजार रुपये हस्तगत केले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.