Bhosari News : विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वाराची वाहतूक पोलिसाला अरेरावी

रस्त्यावर जीव देण्याचा प्रयत्न, पोलीस ठाण्यात पोलिसावर काच घेऊन धावला

एमपीसी न्यूज – विनामास्क दुचाकीवरून फिरणाऱ्या एकाला वाहतूक पोलिसांनी अडवले. त्यावरून वाहतूक पोलोसासोबत हुज्जत घालून दुचाकीस्वाराने रस्त्यावरच गोंधळ घातला. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांखाली येऊन तो जीव देण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला पोलीस ठाण्यात आणले असता तिथेही त्याने डोके आपटून खिडकीची काच फोडली आणि फुटलेली काच घेऊन पोलिसांच्या अंगावर धावला. याबाबत दुचाकी चालक तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 23) दुपारी पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे घडला.

विकी अरविंद बागुल (वय 25, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार राजीव रणदिवे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सहाय्यक पोलीस फौजदार रणदिवे भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ते मंगळवारी पुणे-नाशिक महामार्गावर गुडविल चौकाच्या मागे कर्तव्य बजावत होते. दुपारी दीड वाजताच्या सुमारास आरोपी विकी दुचाकीवरून (एम एच 14 / सी आर 5403) आला. त्याने मास्क लावला नसल्याने रणदिवे यांनी त्याला अडवले. त्यावर ‘तू ट्राफिकवाला आहेस, तुला काय अधिकार आहे पावती करायचा’ असे उद्धटपणे म्हटले. त्यानंतर आरडाओरडा करून रणदिवे यांच्या अंगावर धावून येऊन त्यांची गचांडी पकडली.

झटापट करून रणदिवे यांचा चष्मा फोडला. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या खाली पडून जीव देण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे रणदिवे यांनी आरोपी विकी याला भोसरी पोलीस ठाण्यात आणले. तिथेही त्याने डोके आपटून खिडकीची काच फोडली. फुटलेली काच घेऊन रणदिवे यांच्याकडे धावला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.