Thergaon News: निकृष्ट दर्जाच्या कामामुळे महिन्याभरापासून हजारो लीटर पाण्याची गळती; ठेकेदारावर कारवाई करा – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – निगडीतील सेक्टर 23 ते थेरगावातील पाण्याच्या टाकीपर्यंतच्या एक मीटर व्यासाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. मागील महिन्याभरापासून या पाईपलाईनमधून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. एकीकडे करदात्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना दुसरीकडे निकृष्ट कामामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. ठेकेदार महापालिका अधिका-यांनाही दाद देत नाही. त्यामुळे तातडीने व्हीआयएल या ठेकेदारावर कारवाई करण्याची सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आयुक्तांना केली आहे.

याबाबत आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे की, पिंपरी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने निगडीतील सेक्टर 23 ते थेरगावातील पाण्याच्या टाकीपर्यंत एक मीटर व्यासाच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेतले होते. महापालिकेने चार वर्षांपूर्वी हे काम व्हीआयएल या ठेकेदाराला दिले. काम पूर्ण झाल्यामुळे महापालिकेने महिन्याभरापासून पाईपलाईनमधून पाणी सोडण्यास सुरुवात केली. पण, ठेकेदाराने पाईपलाईनचे काम दर्जात्मक केले नाही. डांगे चौक ते बिर्ला हॉस्पिटलपर्यंत पाईपलाईनमध्ये मोठे लिकेज आहेत. त्यामुळे पाणी गळती होत असून ठिक-ठिकाणी पाणी साचत आहे. मागील महिन्याभरापासून हजारो लीटर पाणी वाया जाते. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

याबाबत मी स्वत: आपणाकडे दोनवेळा तक्रार केली. परंतु, आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करुनही व्हीआयएल या ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचे काम केल्याने हजारो लीटर पाण्याती गळती होत आहे. स्थानिक नागरिकांकडूनही पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांकडे सातत्याने तक्रार केली जात आहे. परंतु, संबंधित ठेकेदार महापालिका प्रशासनाला दाद देत नाही. पाईपलाईन तातडीने दुरुस्त करावी. तोपर्यंत पाईपलाईनमध्ये पाणी सोडू नये. व्हीआयएल या ठेकेदारावर तत्काळ कारवाई करावी, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली आहे.

हजारो लीटर पाणी वाया जात असताना प्रशासन गप्प का?

मागील सत्ताधा-यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे अडीच वर्षांपासून पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. सध्या अनेक ठिकाणी पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. कमी दाबाने, अपुरा पाणीपुरवठ्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही.

अशी परिस्थिती असताना मागील महिन्याभरापासून लिकेज पाईपलाईनमधून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. तरी, देखील प्रशासन संबंधित ठेकेदारावर कारवाई का करत नाही. प्रशासन मुग गिळून गप्प का बसले आहे, अधिका-यांचे काही हितसंबंध गुंतले आहेत का, असा सवालही खासदार बारणे यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.