Transgenders Pension : तृतीयपंथी घटकाला स्वाभिमानी, स्वावलंबी बनविण्यासाठी घेतलेला निर्णय परिवर्तनवादी, क्रांतीकारी

तृतीयपंथी संघटनाकडून महापालिका प्रशासनाचे आभार

एमपीसी न्यूज – समाजातील दुर्लक्षित असलेल्या तृतीयपंथी (Transgenders Pension) घटकाला  स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घेतलेले निर्णय परिवर्तनवादी आणि क्रांतीकारी आहेत. महापालिकेचे हे काम कौतुकास्पद असून आम्हाला माणूस  म्हणून सन्मान मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणा-या पिंपरी चिंचवड महापालिकेचे आम्ही मनापासून अभिनंदन करत आहोत, अशा शब्दांत तृतीयपंथी प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तृतीयपंथी घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी नुकतीच विविध योजनांना मंजुरी देऊन त्या योजना जाहीर केल्या.  शिवाय तृतीयपंथी घटकांना  ग्रीन मार्शल पथकामध्ये नेमणूक देण्याचा, वायसीएम रुग्णालयात या घटकांसाठी स्वतंत्र बेड आरक्षित ठेवण्याचा, महापालिकांच्या काही उद्यानांच्या देखभालीचे काम देण्याचा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

तृतीयपंथीयांसाठी पेन्शन योजना –

तृतीयपंथीयांसाठी (Transgenders Pension) पेन्शन योजना, त्यांच्या बचत गटांना अर्थसहाय्य अशा नाविन्यपूर्ण योजना सुरु केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज  तृतीयपंथीय प्रतिनिधींनी आयुक्त राजेश पाटील यांचे पुष्पगुच्छ, भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत आणि शाल देऊन अभिनंदन केले. त्यावेळी या प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महापालिकेने सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल उचलून उपेक्षित घटकांना समतेची वागणूक आणि त्यांचे न्याय हक्क अधिकार देण्याचे  स्तुत्य काम केले आहे, असेही या प्रतिनिधींनी सांगितले.

रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्था, रयत विद्यार्थी विचार मंच आदी संघटनांनी आयुक्त राजेश पाटील यांची महापालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले.

यामध्ये तृतीयपंथी संघटनेच्या (Transgenders Pension) आशा देसले, रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामा भोरकडे, खजिनदार निलेश पवार, तृतीयपंथी सदस्य सिद्धी कुंभार, रोहिणी परमार, अनुष्का मंजाळ, अनु जगताप, शनया,  रयत विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष धम्मराज साळवे, प्रदेश महासचिव संतोष शिंदे, प्रभारी अध्यक्ष अमर मुनेश्वर, शहराध्यक्ष मयूर जगताप, महासचिव प्राजक्ता गायकवाड, सचिव प्रगती कोपरे, संघटक अभिजित लगाडे, समाधान गायकवाड यांचा समावेश होता.  यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते.

Transgender in Pune : तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेचे क्रांतिकारक पाऊल

आयुक्त राजेश पाटील यांचे अभिनंदन

रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेने याबाबत आयुक्त राजेश पाटील यांचे अभिनंदन करणारे पत्र दिले आहे. त्या पत्रात ते म्हणतात,  भारतीय संविधानाद्वारे आपला भारत देश समता,न्याय, बंधुता या तत्वावर चालतो.पण आम्ही तृतीय पंथी समता, न्याय, बंधुता यापासून नेहमीच वंचित राहिलो. आमच्या पदरी नेहमी उपेक्षा, अपमान, दारिद्र्य हेच आले. भारतीय संविधानाने आम्हाला माणूस म्हणून स्वीकारले, आमचे हक्क अधिकार मान्य केले. परंतु समाजात मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. देश स्वतंत्र होऊन एवढी वर्षे झाली तरी आम्हाला आजही माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळावी यासाठी लढा द्यावा लागतो.

पण चांगल्या गोष्टी देखील आमच्या बद्दल घडतात याचा प्रत्यय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धाडसी ऐतिहासिक निर्णयांमुळे आला आहे. महापालिकेने दुर्लक्षित तृतीयपंथी घटकाला मुख्य प्रवाहात  आणण्यासाठी न्यायाची भूमिका घेत सामाजिक क्रांतीचे  निर्णय घेतले आहेत. आम्हाला समाजात सन्मान मिळावा याकरिता महाप्लीकेने आदर्श पाऊल उचलले आहे. महापालिकेचा हा निर्णय केवळ पिंपरी चिंचवड शहरापुरता मर्यादित राहणार नसून भविष्यात देशातील सर्व तृतीयपंथीयांना समाजात न्याय आणि प्रतिष्ठा लाभेल यासाठी ही नांदी ठरेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.