Talegaon Dabhade News: इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा दमछाक झाल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे जवळ आंबी येथे घडली.

अनिमेश शांताराम व्होटकर (वय 20, रा. समता कॉलनी, वराळे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या संदर्भात रोहित नरेश वाल्मिकी(वय 29, रा. समता कॉलनी, वराळे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

अनिमेश  व्होटकर आणि त्याचा मित्र रोहित वाल्मिकी हे दोघे इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी उतरले. एका काठावरून नदीच्या दुसऱ्या काठाकडे पोहत जात असताना पात्राच्या मध्यभागी दमछाक झाल्याने अमिनेशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्यू टीम, वन्यजीव रक्षक संस्था, मावळ यांच्या सदस्यांनी शोध मोहीम राबवली. सुमारे दीड तासाच्या शोध मोहिमेनंतर अनिमेशचा मृतदेह शोधण्यात यश आले.

घटनेचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे आणि सहकारी स्टाफ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. वामन गेंगजे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.