Dehuroad News : कमी किमतीत सोने देण्याच्या बहाण्याने घेऊन जाऊन तोंडावर मिरची पूड टाकून नऊ लाखाची रोकड जबरदस्तीने पळवली

एमपीसी न्यूज – कमी किमतीत सोने देतो असे सांगून एका व्यक्तीला रावेत येथे नेले. तिथे काही जणांनी मिळून व्यक्तीला धक्काबुक्की करत मिरची पूड तोंडावर टाकून चाकूचा धाक दाखवत नऊ लाख रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना 8 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मुंबई-सातारा सर्व्हिस रोड, रावेत येथे घडली.

रमेश हिराचंद बाफना (वय 46, रा. कॅम्प पुणे) यांनी याबाबत रविवारी (दि. 11) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर भालेराव आणि साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाफना आणि आरोपी सागर भालेराव हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सागर याने बाफना यांना कमी किमतीत सोने देतो असे सांगितले. सोने देण्यासाठी सागर याने बाफना यांना मुंबई-सातारा सर्व्हिस रोड, रावेत येथे नेले. तिथे दुचाकीवरून सागरचे साथीदार आले. आरोपींनी बाफना यांना धक्काबुक्की करत मिरची पूड तोंडावर टाकली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून बाफना यांच्या गाडीतील 9 लाख रुपये रोख रक्कम आरोपींनी जबरदस्तीने चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.