Pimpri News : आमदार लक्ष्मण जगताप हे लोकनेते, लवकरच पुन्हा सक्रिय होतील – मंत्री नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी रुग्णालयात जाऊन घेतली आमदार जगतापांची भेट!

एमपीसी न्यूज – आजारपणामुळे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांना बाणेर येथील ज्युपीटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर झाली असून, अनेक दिग्गजांकडून त्यांची विचारपूस करण्यात आली आहे. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आमदार जगताप यांच्या भेटीसाठी रविवारी (दि. 15) रुग्णालयात आले होते. त्यांनी आमदार जगताप यांच्यासोबत संवाद साधून त्यांनी प्रकृतीची विचारपूस केली तसेच आमदार जगताप यांचे बंधू व माजी नगरसेवक शंकर जगताप आणि उद्योजक विजय जगताप यांच्याकडून प्रकृतीविषयी अधिक माहिती जाणून घेतली. त्यानंतर हा लोकनेता लवकरात लवकर सार्वजनिक जीवनात पुन्हा सक्रिय होईल, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.

आमदार जगताप हे रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी कार्यकर्ते, नातेवाईक, हितचिंतक प्रार्थना करत आहेत. ही प्रार्थना आणि डॉक्टरांनी केलेले उपचार फळास आले असून, आमदार जगताप यांची प्रकृती आता स्थिर आहे. आमदार जगताप यांचे राजकारणातील प्रत्येकांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे आतापर्यंत अनेक दिग्गजांनी रुग्णालयात धाव घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार व माजी मंत्री डॉ. गिरीश महाजन, आमदार आशिष शेलार, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक आजी व माजी मंत्री आणि दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही रविवारी रुग्णालयात जाऊन आमदार जगताप यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी आमदार जगताप यांच्यासोबत संवाद साधत लवकर बरे व्हा, अशी भावना व्यक्त केली तसेच मंत्री राणे यांनी आमदार जगताप यांचे बंधू व माजी नगरसेवक शंकर जगताप आणि उद्योजक विजय जगताप यांच्याकडून त्यांच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती जाणून घेतली.

आमदार जगताप हे आणखी काही काळ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहणार आहेत. ते लोकनेते आहेत. लोकांपासून ते फार काळ दूर राहू शकणार नाहीत. हा लोकनेता लवकरात लवकर सार्वजनिक जीवनात पुन्हा सक्रिय होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.