Vadgaon Maval: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करा; मावळ भाजप किसान मोर्चाची मागणी

वर्ष 2011 मध्ये क्रांती दिनाच्या दिवशी याबाबत शेतक-यांनी आंदोलन केले होते. केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागून गोळीबार झाला होता.

एमपीसी न्यूज- पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पास मावळ तालुक्यातील शेतक-यांचा विरोध कायम आहे. त्यामुळे सरकारने हा प्रकल्प रद्द करून शेतक-यांच्या 7/12 उता-यावरील शिक्के काढून टाकावेत, अशी मागणी मावळ तालुका भाजप किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात तहसीलदार मधुसूदन बर्गे व नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांना किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुभाष धामणकर यांच्यासह विकास शेलार, किरण राक्षे, गुलाब घारे, जालिंदर धामणकर, छबूराव पापळ, बाळासाहेब पिसाळ आदींनी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले की, पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प महापालिकेने निश्चित केला होता.

मावळ तालुक्यातील शेतक-यांनी या प्रकल्पाला सुरूवातीपासून विरोध केला आहे. वर्ष 2011 मध्ये क्रांती दिनाच्या दिवशी याबाबत शेतक-यांनी आंदोलन केले होते. केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागून गोळीबार झाला होता. या आंदोलनानंतर सरकारने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापपर्यंत ते पूर्ण झाले नाही.

आजही या प्रकल्पाला मावळच्या शेतक-यांचा विरोध कायम आहे. त्यामुळे राज्य शासनाने हा प्रकल्प रद्द करावा तसेच शेतक-यांच्या 7/12 उता-यांवर असलेले ‘निगडी जलशुध्दीकरण केंद्र बंद पाईपलाइन करीता संपादित’ हे शेरे तत्काळ काढून टाकण्यासाठी शासन स्तरावर संबंधित विभागास योग्य ते आदेश देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी अशी विनंती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.