Vadgaon Maval : पक्षांतरात सामाजिक बांधिलकी दिसतच नाही – जयंत पाटील

एमपीसी न्यूज : सध्याच्या काळात (Vadgaon Maval) तत्वाने राजकारण करण्याची प्रथा कमी झाली आहे. निवडणुकीच्या राजकारणात व्यावसायिकता शिरली आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी मागे पडत चालली आहे. सामाजिक बांधिलकी जपून पक्षांतर केले असे होताना दिसत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. सामुदायिक जबाबदारी व सदवर्तनानेच ही परिस्थिती बदलू शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या देशात प्रत्येकाची राजकारणाची आणि सामाजिक बांधिलकी जपण्याची पद्धत वेगवेगळी आहे. स्वतंत्र भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी मला काहीतरी करायचं आहे की याच भावनेने पंडित नेहरूंनी कामाला सुरुवात केली आणि अनेक नवनवीन गोष्टींचा पाया घातला.आज ‘लोकं’ इकडून तिकडे जात आहेत यात कुठेही सामाजिक बांधिलकीचा आशय शिल्लक रहात नाही.पक्ष बदलणाऱ्यांना आपण का पक्ष बदलतोय याबद्दल माहिती नसते असा खोचक चिमटा यावेळी त्यांनी काढला.

नवरात्रीनिमित्त येथील मावळ विचार मंचाने आयोजित केलेल्या सरस्वती व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना पाटील बोलत होते. आमदार सुनील शेळके, पुणे पीपल्स को.ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, मावळ विचार मंचाचे संस्थापक भास्कर आप्पा म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ.रवींद्र आचार्य, अध्यक्ष सुदेश गिरमे, पोटोबामहाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त सुभाषराव जाधव, नगरसेवक गणेश काकडेसह मोठ्या संख्येने नागरीक व महिला भगिनी उपस्थित होत्या.

राजकारण व सामाजिक बांधिलकी या विषयावर (Vadgaon Maval) बोलताना पाटील म्हणाले की, पूर्वीचे राजकारण विचारधारेवर, संस्कारावर व सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून चालत होते. पूर्वीचे नेतेही सामाजिक बांधिलकीने प्रेरित झालेले होते. त्यामुळे व्यक्ती सेवा व प्रतिमेवर निवडून येत असे. सध्याच्या काळात मात्र अशी परिस्थिती राहिलेली नाही. तत्वाची चर्चा आता होत नाही. निवडणुकीचे तिकीट देताना उमेदवाराची खर्च करण्याची क्षमता आहे का? असा प्रश्न सर्वच पक्षाकडून विचारला जातो. जीवा- भावाच्या खऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा कंत्राटी कार्यकर्त्यांची गर्दी अधिक झाली आहे. निवडून आलेला आमदार पुढच्या निवडणुकीत त्याच पक्षात राहील याची शाश्वती देता येत नाही. त्यांना पक्ष नेतृत्वाची भीती राहिलेली नाही.

PMPML News: संचलन तुटीपोटी 10 कोटी देणार; स्थायी समितीची मान्यता

त्यामुळे प्रत्येक पक्षाला आमदार सांभाळण्यासाठी शक्ती खर्ची घालावी लागत आहे. जास्त खर्च केल्यावर निवडून येतो अशी मतदारांची तयार केली गेलेली मानसिकता धक्कादायक आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवाराचा सामाजिक बांधिलकीशी संबंध कमी झाला आहे. ही स्थिती लोकशाहीसाठी घातक असून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पराकाष्ठा करावी लागेल. सदवर्तन व सामुदायिक जबाबदारीतून ही परिस्थिती बदलू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाटील यांनी विविध राजकीय पक्षांमध्ये झालेल्या स्थित्यंतरावरही परखड मत व्यक्त केले. आपला राजकीय प्रवासही त्यांनी श्रोत्यांना उलगडून दाखवला.

व्याख्यानमालेत सर्व पक्षीय नेत्यांना सामावून घेण्याच्या मावळ विचार मंचाच्या धोरणाचे आमदार शेळके यांनी कौतुक केले. सन्मान पत्राचे वाचन हर्षदा जोशी (दुबे) यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक भास्कर आप्पा म्हाळसकर यांनी केले. भूषण मुथा यांनी सूत्रसंचालन केले. अतुल राऊत यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.