Wakad : पोलिसांनी 12 लाखांचे 101 मोबाईल फोन मूळ मालकांना केले परत

वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी, तक्रारदार नागरिक उपस्थित

एमपीसी न्यूज – हरवलेले, चोरीला गेलेले 101 मोबाईल फोन पोलिसांनी तक्रारदारांना परत केले. ही कामगिरी वाकड पोलिसांनी केली. तब्बल 12 लाख रुपयांचे मोबाईल फोन तक्रारदारांना देण्यात आले.

वाकड येथे मूळ मालक तसेच तक्रारदारांना मोबाईल फोन प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी, तक्रारदार नागरिक उपस्थित होते.

अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे म्हणाले, “पोलिसांसाठी प्रत्येक काम जोखमीचे असते. नागरिक प्रत्येक गोष्टीसाठी पोलिसांना जबाबदार धरतात. परंतु जी बेसिक काळजी घ्यायला हवी ती काळजी नागरिक घेताना दिसत नाहीत. ब-याच वेळेला नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे काही अघटित घटना घडतात. बेसिक काळजी घेतल्यास गुन्हे घडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल. नागरिकांनी प्रत्येक बाबतीत सतर्क राहायला हवे. जर मोबाईल चोरी, वाहन चोरी सारखे गुन्हे कमी झाले तर पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्याच्या अन्य कामांमध्ये लक्ष घालता येईल. वाकड पोलिसांनी जे काम केलं आहे, ते उल्लेखनीय आहे. अशाच प्रकारचे काम पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अन्य पोलीस ठाण्यात करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील म्हणाल्या, “मोबाईल फोनमध्ये अतिमहत्वाची माहिती सेव्ह करून ठेवली जाते. मोबाईल माणसाचा अविभाज्य घटक बनला आहे. आपला मोबाईल फोन चोरीला गेल्यास आपण खूप हताश होतो. तक्रार नोंदविल्यानंतर तो सापडण्यासाठी पोलिसांना देखील तारेवरची कसरत करावी लागते. वाकड पोलिसांनी महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून देखील मोबाईल फोन हस्तगत तसेच मिळविण्यात आले आहेत. मोबाईल फोन मिळाल्यानंतर सर्वांनी सर्वप्रथम तो फॉरमॅट करावा आणि नंतर वापरावा, अशी सूचना देखील उपायुक्त पाटील यांनी उपस्थित नागरिकांना दिला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने म्हणाले, “मोबाईल फोन सारख्या लहान गोष्टींचा बहुतांश वेळेला शोध घेतला जात नाही. परंतु वाकड पोलिसांनी मोबाईल फोनचा शोध घेऊन तक्रारदार आणि मूळ मालकांना देण्यात आले.”

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन, पोलीस उप निरीक्षक हरीश माने, तपास पथकातील शाम बाबा, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, प्रमोद कदम, मोहम्मदगौस नदाफ, अशोक दुधवणे, सुरेश भोसले, धनराज किरनाळे, दादा पवार, रमेश गायकवाड, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, राजेश बारशिंगे, गणेश गिरीगोसावी, नितीन गेंजगे, मधुकर चव्हाण, विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.