शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Chikhali : ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी देत मागितली खंडणी

एमपीसी न्यूज – ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी देत आपण या भागातले भाई असल्याचे सांगत चार जणांनी मिळून ज्वेलर्स दुकानदाराकडे खंडणी मागितली. हा प्रकार 14 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत मोरेवस्ती चिखली येथे घडला. ज्वेलर्सच्या फिर्यादीनुसार स्वयंघोषित भाईला अटक करण्यात आली आहे.

तुषार भंडारी (रा. चिंचेचा मळा, मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजाराम रघुनाथ मोरे (वय 32, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मोरेवस्ती मध्ये अंगणवाडी रोडवर पूजा ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आरोपी फिर्यादी यांच्या दुकानात आला. ‘तुला दुकान चालवायचे असेल तर मला हप्ता द्यावा लागेल. तू येथील स्थानिक नागरिकांना विचार तुषार भंडारी कोण आहे. मग तुला माझ्याबद्दल समजेल’ असे म्हणत आरोपीने फिर्यादी यांची कॉलर पकडली.

‘तुला समजले का मी कोण आहे. मी या एरियाचा भाई आहे. तुला हप्ता द्यावा लागेल’ असा दम देत आरोपीने दुकानाबाहेर आरडाओरडा करून दुकानाच्या बाहेर लावलेल्या दुचाकीला लाथा मारून शिवीगाळ करत आरडाओरडा करून दहशत निर्माण केली.

‘मी टॉवर लाईन येथील एकाचा शॉट वाजवणार आहे. त्यामध्ये मी आत जाणार आहे. त्याच्याबरोबर तुझा पण शॉट वाजविल. त्यानंतरच तू मला हप्ता चालू करशील. तुला लय माज आलाय. तुला माझ्या विरुद्ध तक्रार करायची असेल तर कर जा. मला काही फरक पडत नाही. तू मला आता 50 हजार रुपये दे व दरमहा 10 हजार रुपये द्यावा लागेल’ असे म्हणत आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या भावाला हप्ता देण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

spot_img
Latest news
Related news