Wet and Joy Water Park : स्थानिक तरुण कामगारांवर अन्यायाचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज : (श्याम मालपोटे) – मावळ तालुक्यात मुंढावरे फांगणे हद्दीत असलेल्या मालपाणी यांच्या मालकीचे वेट अँड जॉय वॉटर पार्कमधील (Wet and Joy Water Park) गेल्या 8 ते 10 वर्षांपासून काम करत असलेल्या स्थानिक कामगारांना जाणीवपूर्वक कामावरून कमी करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित प्रशासनाने त्यांना कामावर परत रुजू न केल्यास जशास तसे उत्तर देऊ असा इशारा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिला.

दरम्यान आज प्रत्यक्ष स्थळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी भेट दिली व संबंधित व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना स्वतः संपर्क करत सर्व कामगारांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा आणि त्यांना तात्काळ कामावर रुजू करून घ्यावे; अन्यथा मोठे आंदोलन उभारू असा इशारा त्यांनी दिला व सदर प्रकरण मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या कानावर घालण्यात आले.

Rupali thombare: पुन्हा पानटपरीवर चुना लावायला बसावं लागेल; रूपाली ठोंबरे यांचा निशाणा कोणावर? 

संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाचे वेट अँड जॉय हे वॉटर पार्क गेल्या 10 वर्षांपासून कार्यरत आहे. जुना मुंबई पुणे हायवे लगत असल्याने हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. पार्कमध्ये फक्त उन्हाळ्यातील सीजनमध्ये जादा पर्यटक येत असल्याने तात्पुरत्या स्वरूपाची कामगार भरती कंत्राटी पद्धतीने ठराविक कालावधीसाठीच केली जाते. दरम्यान जे भूमिपुत्र गेले 8 ते 10 वर्षांपासून काम करतात, त्यांना देखील कामावरून कमी केल्याने व नाहक त्रास देत त्यांना त्रस्त केले जात असल्याने व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सदर घटनेची गंभीर दखल घेत बाळा भेगडे यांनी सर्व कामगारांसह वॉटर पार्क येथे जात तेथील (Wet and Joy Water Park) अधिकाऱ्यांना संपर्क केला असता 1 सप्टेंबर पर्यंत सर्व कामगारांना पुन्हा रुजू न केल्यास आंदोलन करू व वॉटर पार्क बंद करू असा इशारा दिला आहे.

सदर व्यवस्थापन बाळा भेगडे यांनी दिलेल्या इशाऱ्याला कसा प्रतिसाद देते व गांभीर्याने दखल घेऊन कामगारांना पुन्हा कायमस्वरूपी कामावर रुजू करते की नाही, हे आता पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.