Chandrakant Patil : शाईफेक प्रकरणानंतर चंद्रकांतदादा म्हणाले…

एमपीसी न्यूज – चिंचवड गावातील शाईफेक प्रकरणानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील (Chandrakant Patil) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. विरोधकांना नामोहरम करण्याची ताकद परमेश्वर, साधना देते, असे ते म्हणाले.

चिंचवड देवस्थान ट्रस्ट आयोजित श्रीमन महासाधू मोरया गोसावी समाधी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी जात असताना पाटील यांच्या चेहऱ्यावर शाईफेक करण्यात आली. त्यामुळे गोंधळ उडाला. या प्रकारानंतर कपडे बदलून चंद्रकांत पाटील कार्यक्रमास उपस्थित राहिले.

उद्घाटनपर भाषणात पाटील (Chandrakant Patil) यांनी शाईफेक प्रकरणी पहिली जाहीर प्रतिक्रिया दिली.

Chinchwad News: चिंचवडगावात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक

पाटील म्हणाले की, ”अर्ध्या तासापूर्वी माझ्यावर हल्ला झाला, हल्लेखोरांना वाटले होते की, आता हे गर्भगळीत होतील, लपून बसतील. पण, शर्ट बदलला आणि मी कार्यक्रमाला आलो. ही ताकद मला साधनेतून  मिळाली. ही परमेश्वराने चालविलेला खेळ आहे. या खेळात कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.”

Chinchawad News : चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या त्या तरुणाची ओळख पटली

“मला सावित्रीबाई फुले आठवल्या. सावित्रीबाई मुलींना शिकविण्यासाठी जाताना लोक त्यांच्यावर शेण मारायचे. मी सावित्रीबाई यांच्याशी तुलना करत नाही. पण, मी त्यांच्यापासून प्रेरणा घेतो. त्यामुळे मी बॅगेतील शर्ट काढला आणि कार्यक्रमाला आलो”, असे ते (Chandrakant Patil) म्हणाले.

विरोधकांना नामोहरम करण्याची ताकद परमेश्वर, साधना देते. गोंधळानंतर अनेकांना वाटले असेल मी पुण्यात जातो. पण, पिंपरी, पुणे आणि कोल्हापूरही माझे घर आहे. साधू संतानी सांगितले आहे हे विश्वची माझे घर, झाडे, फुले हे सगळे आपले सगे सोयरे आहेत. त्यामुळे हल्ला करणाराही सोयराच म्हणावे लागेल”, असेही पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.