Chinchwad News : इतिहास अभ्यासताना विषयाच्या खोलात गेले पाहिजे – विश्वास पाटील

एमपीसी न्यूज – जीवनात घडत असलेल्या साध्या व छोट्या घटना, प्रसंगांमधून बोध घेत समर्पक कल्पना आणि उत्तम शब्दांद्वारे  लेखन केल्यास, साहित्य समीक्षकांसह वाचक देखील त्या लेखकाची नोंद घेतात.अभ्यासकांनी इतिहास अभ्यासताना विषयाच्या खोलात गेले पाहिजे. समकालीन लोकांच्या विविध साहित्याचा अभ्यास केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे 13 ते 21 ऑगस्ट या कालावधीमध्ये व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेमधील पहिले पुष्प पानिपतकार विश्वास पाटील यांनी गुंफले. महानायक ते महासम्राट या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. त्यावेळी ते बोलत होते.

प्रारंभी विश्वास पाटील आणि आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या साहित्य अमृत ग्रंथोस्तव व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी  अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, उपआयुक्त रविकिरण घोडके, विठ्ठल जोशी, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, उमाकांत गायकवाड, विजयकुमार थोरात, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे राजन लाखे, ज्ञानगंगा प्रकाशनाचे उमेश पाटील, जगत्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाचे संचालक राजू महाराज ढोरे, संचालिका डॉ. स्वाती मुळे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह संतपीठ तसेच महापालिकेच्या शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते.

इतिहासाचा अभ्यास करताना तत्कालीन सर्वांगीण राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती समजावून घेतली पाहिजे, असे नमूद करून विश्वास पाटील म्हणाले, स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊंचा स्वराज्यासाठीचा संघर्ष हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.मावळ परिसरात स्वराज्याची यशस्वी जडणघडण होण्यामागचे कारण शहाजी महाराज आणि शिवाजी महाराजांनी या परिसरात निर्माण केलेली राज्यव्यवस्था आणि देशपांडे, देशमुख तसेच परिसरातील सरदार यांच्याद्वारे केलेला राज्यकारभार होय.याठिकाणी असलेल्या लोकांचा योग्य उपयोग त्यांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी केला.शहाजीराजे यांच्या ऐतिहासिक संदर्भांची मांडणी देखील विश्वास पाटील यांनी केली.

स्वातंत्र्य चळवळीत टिळक युगानंतर नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमध्ये आणि देशामध्ये तरुणांच्या युगाची सुरुवात केली.त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केले. यासाठी त्या काळातील उपलब्ध असलेले विविध दस्तावेज चाळणे आवश्यक आहे. सुभाषबाबुंच्या संदर्भातील घटनांचे दाखले त्यांनी यावेळी दिले.त्यांनी लिहिलेल्या पानिपत, महानायकपासून महासम्राट पुस्तकांमधील विविध पैलू आणि पात्रांचे कंगोरे विश्वास पाटील यांनी उलगडले.

दरम्यान, 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता चरित्र लेखन-एक प्रवास या विषयावर प्रसिध्द लेखिका विणा गवाणकर यांच्याशी मुक्त संवाद साधला जाणार आहे.गझलकार अनिल आठलेकर हे त्यांची मुलाखत घेणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.