YCHM News: प्रसूती कक्ष ‘सलाईन’वर…!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील प्रसूती कक्षातील डॉक्टर, कर्मचारी यांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे गरोदर महिलांची फार कुचंबणा होत आहे.  महिलांचे हाल होत आहेत. प्रसूती कक्षात महिला उपचारासाठी आल्यानंतर योग्य वागणूक दिली जात नाही. त्यामुळे हा कक्षच ‘सलाईन’वर आहे. महिलांचे होणारे हाल थांबवावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस इखलास सय्यद शे खयांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात सय्यद शेख यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील गोरगरीब रूग्णांना  जीवनदायी असलेले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे महापालिकेच्या वतीने चालवण्यात येते. शहरातील व आजूबाजूच्या गाव खेड्यातील अनेक नागरिक याठिकाणी आरोग्य सुविधेचा लाभ घेतात मात्र, मागील काही महिन्यांपासून  रुग्णालयातील प्रसूती कक्ष सलाईनवर गेला आहे. रुग्णालय व्यवस्थापन ,त्या कक्षात असणारे डॉक्टर ,कर्मचारी यांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे गरोदर महिलांची फार कुचंबणा होत आहे.

प्रसूती कक्षात महिला उपचारासाठी आल्यानंतर योग्य वागणूक दिली जात नाही. गरोदर महिला प्रसूती वेदनेने विव्हळत असताना देखील त्यांना खाली फरशीवर बसवले जाते. प्रसंगी स्वतः च्या चादरीवर खाली झोपण्यास सांगितले जाते.  अनेक गरोदर महिलांना व त्यांच्या नातेवाईकांना  इतर खासगी हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यासाठी सल्ला दिला जातो.

खासगी रुग्णालयातील खर्च सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. या सर्व आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटकातील रुग्णांचे हाल होत असून आपण तातडीने या सर्व प्रकाराबाबत चौकशी समिती नेमावी. याबाबत मी स्वतः तीन वेगवेगळ्या केसेस मध्ये अनुभव घेतला आहे. एखाद्या गरोदर महिलेच्या गर्भात बाळाला व्यंग असल्यास गर्भपातासाठी आल्यास त्यांना सुद्धा व्यवस्थित वागणूक दिली जात नाही. या सर्व प्रकारची आपण दखल घेऊन महिला वर्गाची होणारी हाल अपेष्टा थांबवावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.