Pimpri News: ‘राजाभाऊ, विचाराची लढाई विचारानेच लढावी लागते’

एमपीसी न्यूज – भाजप म्हणजे पार्टी विथ डिफरन्स, शिस्तीचा पक्ष, पक्षाचे कार्यकर्ते शांतपणे संघटनेचे काम करणारे, आक्रस्ताळेपणा नाही, आरोपांना संयमाने प्रत्युत्तर अशी ओळख भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची राहिली आहे. पण, त्याला तडा जाणारी घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे.

कोणाचेही नाव न घेता झालेल्या आरोपावर उत्तर देण्यासाठी सोशल मीडियावर भाजपचे सरचिटणीस राजू दुर्गे अवतरले. फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी नाहक स्वत:वर आरोप घेत प्रत्युत्तर दिले. त्यात एकेरी, असंसदीय शब्दांचा वापर केला. थेट महापालिका सभागृहात येऊन काळे फासण्याची धमकी दिली. हे भाजपच्या कोणत्या संस्कृतीत बसते, असा सवाल केला जात आहे. विचाराची लढाई विचारानेच लढावी लागते, असे मत राजकीय वर्तुळातील जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील भटक्या श्वानांच्या नसबंदीत सत्ताधारी भाजपच्या एका सरचिटणीसाने 70 लाखांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी 18 नोव्हेंबर रोजी झालेल्या महासभेत केला होता. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. फक्त भाजपच्या एका सरचिटणीसाशी संबंधित या संस्था आहेत. वेळप्रसंगी ते सिद्ध करून दाखवेन असे सभागृहात सांगितले. त्यावर पाच दिवस भाजपकडून कोणीही उत्तर देण्यास पुढे आले नाही. भाजपच्या चार सरचिटणीसापैकी एकानेही ‘ब्र’ शब्द काढला नाही. कोणाचेही नाव घेतलेले नसताना चार सरचिटणीसपैकी एक असलेले राजू दुर्गे पुढे आले.

फेसबुकवर आक्रस्ताळेपणा करत योगेश बहल यांच्या आरोपाला उत्तर दिले. कोणाचेही नाव घेतले नसतानाही दुर्गे पुढे आल्याने आरोपांचा बाण त्यांच्या दिशेने गेला. भाजपच्या संस्कृतीप्रमाणे आरोपांना संयमाने प्रत्युत्तर देणे अपेक्षित असताना दुर्गे यांनी थेट धमकीच दिली. आरोप स्वत:वर घेत बहल यांना उत्तर दिले. त्यात एकेरी, असंसदीय शब्दांचा वापर केला. सभागृहात येऊन काळे फासण्याची धमकी दिली. आरोप करणाऱ्याला थेट काळे फसण्याची धमकी दिली जाते, मग हीच का भाजपची पार्टी विथ डिफरन्स, असा सवाल केला जाऊ लागला आहे.

लोकशाही परंपरेत चुकीच्या कामावर लोकप्रतिनिधी आवाज उठवतात. काही माहितीच्या आधारे आरोप केले जातात. ज्याच्यावर आरोप झालेत त्यांना संयमी भाषेत आरोप खोडून काढता येतात. आरोप खोटे असतील तर न्यायालयीन लढाई लढता येते. पण, इथे कोणाचेही नाव घेतले नसताना असंसदीय शब्दांचा वापर करत प्रतिउत्तर दिले.

पुराव्यानिशी आरोप सिद्ध करुन दाखवा अन्यथा महापालिकेच्या भर सभेत येऊन काळे फासू, अशी नगरसेवक नसतानाही धमकी दिली. खोटे आरोप करता आता मी कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नसतो, असे म्हणत दुर्गे यांनी असंसदीय शब्दांचाही वापर केला. हे भाजपच्या कोणत्या संस्कृतीत बसते, असा सवाल केला जात आहे. विचाराची लढाई विचारानेच लढावी लागते, असा सल्ला दुर्गे यांना पक्षाकडून देण्याची गरज असल्याचे बोलले जाऊ लागले.

दरम्यान, भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या दररोज कोणावर ना कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर दररोज भ्रष्टाचाराचे आरोप करतात. पण, आरोप झालेल्या एकानेही सोमय्या यांना काळे फसण्याची धमकी दिलेली नाही. संयमानेच आरोपांना उत्तर दिले आहे, याकडे जाणकारांनी लक्ष वेधले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.