Nigdi News: जामखेडवरून विक्रीसाठी आणलेला गांजा निगडीत पकडला; एकास अटक

एमपीसी न्यूज – मागील तीन दिवसात अंमली पदार्थ विरोधी पथकाने 35 किलो गांजा पकडला आहे. जामखेड येथून निगडी येथे विक्रीसाठी आणलेला पाच किलो गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि. 24) पकडला. यामध्ये एकाला अटक करण्यात आली आहे.

दुर्गेश भानुदास खाडे (वय 30, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने बापू पवार (रा. जामखेड, परांडा) याच्याकडून गांजा विक्रीसाठी आणला होता. त्यामुळे बापू पवार याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक प्रसाद कलाटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गेश याने बापू पवार याच्याकडून जामखेड येथून विक्री करण्यासाठी गांजा आणला. तो त्याने राजनगर येथे त्याच्या घरासमोरील शेडमध्ये ठेवला. याबाबत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली. पोलिसांनी शेडवर छापा टाकून कारवाई केली. त्यात पोलिसांना एक लाख 26 हजार 150 रुपये किमतीचा पाच किलो 46 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करत आरोपी दुर्गेश याला अटक केली.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी (दि. 21) भुजबळ चौक वाकड येथे दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल 30 किलो गांजा जप्त केला. आरोपींनी प्रवासी बॅगेतून हा गांजा विक्रीसाठी आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तीन दिवसात 35 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.