Mpc News Vigil : अकरा महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातून 63 सराईत तडीपार

एमपीसी न्यूज – शहरात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, घरफोड्या, जबरी चोऱ्या, मारहाण असे गुन्हे वाढत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस देखील ऍक्शन मूडमध्ये आले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या अकरा महिन्यांच्या कालावधीत 15 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील 63 सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण होत आहे.

15 ऑगस्ट 2018 पासून पिंपरी-चिंचवड शहरासाठी नवीन स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु करण्यात आले. त्यानंतर पहिले पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध पथके, उपक्रम सुरु केले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांची बदली झाली आणि संदीप बिष्णोई नवीन पोलीस आयुक्त म्हणून आले. नवा गडी नवे राज्य या संकल्पनेनुसार कोरोना काळात मनुष्यबळ कमी असल्या कारणाने काही पथके बरखास्त करून तीन मॅनपॉवर आयुक्तांनी थेट रस्त्यावर उतरवली. यामुळे गुन्हे शाखांसह अन्य पथकांची कारवाई रोडावली.

दरम्यानच्या काळात अनेक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलिसांनी तडीपारीचे प्रस्ताव तयार केले. आयुक्तालय सुरु झाल्यापासून 28 महिन्यात 117 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी तडीपार केले. ऑगस्ट 2018 ते डिसेंबर 2019 या कालावधीत 54 गुन्हेगार तडीपार करण्यात आले. तर जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या 11 महिन्यात 63 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस ऍक्शनमध्ये आल्याची चर्चा सुरु झाली.

परिमंडळ एकमधील पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी, दिघी, आळंदी, चाकण या आठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून 24 गुन्हेगार तर परिमंडळ दोनमधील चिखली, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, सांगवी, वाकड, हिंजवडी या सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून 39 गुन्हेगार अकरा महिन्यात तडीपार करण्यात आले आहेत. डिसेंबर महिन्यात देखील काही गुन्हेगार तडीपार करण्यासाठी प्रस्ताव पाठवले जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.