Kisan Railway : किसान रेल्वेच्या 700 फे-या पूर्ण; मध्य रेल्वेने भारतभर केली 2.44 लाख टन फळे, भाज्यांची वाहतूक

एमपीसी न्यूज – शेतक-यांच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी, शेतक-यांना त्यांच्या मालाची चांगली किंमत मिळावी यासाठी रेल्वे विभागाकडून 7 ऑगस्ट 2020 रोजी पहिली किसान रेल्वे सोडण्यात आली. 15 महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेने तब्बल 700 फे-या पूर्ण केल्या असून त्याद्वारे 2 लाख 43 हजार 524 टन फळे आणि भाज्यांची वाहतूक करण्यात आली आहे. 700 वी किसान रेल्वे सांगोला ते आदर्श नगर दिल्ली दरम्यान शनिवारी (दि. 23) निघाली आहे.

ऑपरेशन ग्रीन – टॉप टू टोटल या आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत किसान रेल्वेमध्ये शेतक-यांना वाहतूक खर्चात 50 टक्के अनुदान मिळत आहे. मालाची जलद वाहतूक होत असल्याने तात्काळ बाजारात माल पोहोचत आहे. त्यामुळे कमीत कमी अपव्यव होत असल्याने शेतक-यांना याचा फायदा होत आहे. 7 ऑगस्ट 2020 रोजी किसान रेल्वेची पहिली फेरी सुरु झाली. चार महिन्यानंतर 100 फे-या पूर्ण झाल्या. 12 ऑगस्ट 2021 रोजी 500 तर त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात पुढच्या 200 अशा एकूण 23 ऑक्टोबर 2021 रोजी किसान रेल्वेच्या 700 फे-या झाल्या आहेत.

सोलापूर भागातून डाळिंब, द्राक्षे, लिंबू, शिमला मिर्ची, कस्तूरी खरबूज, पेरू, सिताफळ, बेर (इंडियन प्लम), लातूर आणि उस्मानाबाद भागातून फुले, नाशिक प्रदेशातून कांदा, भुसावळ आणि जळगाव भागातून केळी, नागपूर प्रदेशातून संत्री आदी किसान रेलच्या माध्यमातून दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल सारख्या दूरच्या बाजारपेठांमध्ये फळे आणि भाजीपाला त्वरीत आणि ताज्या पोहचतात. हव्या त्या बाजारपेठेत जाता आल्याने शेतक-यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळत आहे. जलद वाहतूक असल्याने कमीत कमी उत्पादन वाया जाते.

देवळाली – मुझफ्फरपूर, सांगोला – मुझफ्फरपूर, सांगोला – आदर्श नगर दिल्ली, सांगोला – शालीमार, रावेर – आदर्श नगर दिल्ली, सावदा – आदर्श नगर दिल्ली आणि गोधनी – आदर्श नगर दिल्ली या सात मार्गांवर किसान रेल्वेची सेवा सुरु आहे.

अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे
किसान रेल्वेच्या 700 फेऱ्या झाल्या आहेत. किसान रेल्वेमधून शेतकऱ्यांना जलद आणि सुरक्षित वाहतूक करता येत आहे. नवीन मोठ्या बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळाल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.