Vadgaon Maval : कंपनीतील साहित्य चोरून नेण्यास विरोध केल्याने साथीदाराचा खून

एमपीसी न्यूज – बंद पडलेल्या कंपनीतील साहित्य चोरून नेण्यास विरोध केल्याने मित्राचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला. अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाल्यानंतर वडगाव मावळ पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला. ही घटना 27 सप्टेंबर रोजी टाकवे येथे उघडकीस आली.

याप्रकरणी नवनीत भीमराव पाटील (वय 47, रा. कान्हेफाटा ता. मावळ. मूळ रा. मुपो. आर्ते, ता.शिरपूर, जि.धुळे) आणि अर्जुनसिंग ननसिंग सुनार (वय 45, रा. टाकवी बु., ता. मावळ. मूळ रा.नेपाळ) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. वीरेंद्रसिंग (रा. बिहार) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 सप्टेंबर रोजी इंद्रायणी वसाहत इंडस्ट्रीज जवळ रस्त्याच्या कडेला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती अर्जुनसिंग याने पोलिसांना दिली. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नसल्याने तसेच मृत्यूचे नेमके कारण न समजल्याने वैद्यकीय अधिका-यांनी त्याचा व्हिसेरा राखून ठेवला. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद देखील झाली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पोलिसांनी शासकीय नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार केले.

हा मृतदेह रस्त्यापासून 15 ते 20 फुट अंतरावर गवतात आढळून आल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने याबाबत तपास सुरू केला. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पोशाखावरून कंपनीतील कामगार असल्याची शक्यता असल्याने मृतांची ओळख पटविण्याकरिता टाकवे भागातील कंपन्यांमध्येे माहिती काढली. त्यावेळी मृत्यू झाल्याची माहिती देणारा अर्जुनसिंग हा अस्मा मेटल या बंद पडलेल्या कंपनीचा वाॅचमन असून त्याच्यासोबत नेहमी दिसणारा गुरूजी नावाची व्यक्ती काही दिवसांपासून दिसली नाही, अशी माहिती मिळाली. त्यावरून अर्जुनसिंग याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.

अर्जुनसिंग याने जाणीवपूर्वक ही माहिती लपवून ठेवल्याचे समोर आले. खून झालेली व्यक्ती हीच गुरुजी उर्फ वीरेंद्रसिंग असल्याचे त्याने सांगितले. अर्जुनसिंग, कान्हे गावात राहणारा नवनीत पाटील व गुरूजी असे तिघेजण अस्मा मेटल कंपनीत एक वर्षांपूर्वी कामाला होते. परंतु कंपनी बंद झाल्यानंतर नवनीत पाटील आणि गुरुजी यांचे काम बंद झाले. त्यानंतर अर्जुनसिंग हा वॉचमन म्हणून त्याच कंपनीत काम करत होता. याचा फायदा घेऊन या तिघांनी संगमताने कंपनीमधील मशीनचे पार्ट चोरून विकले. याबाबतची माहिती समोर येऊ नये यासाठी वीरेंद्रसिंग याची ओळख लपवली, असल्याचेही अर्जुनसिंग याने सांगितले.

नवनीत पाटील 25 सप्टेंबर रोजी कंपनीतील पार्ट चोरून नेण्यासाठी कंपनीचा वॉचमन अर्जुनसिंगकडे आला होता. परंतु त्यास अर्जुनसिंग व गुरूजीने सामान चोरण्यास विरोध केला. त्यावरून नवनीत याने गुरूजीला कंपनीच्या बाहेर रस्त्यावर नेले. हाताने आणि दगडाने मारहाण केली त्या मारहाणीत गुरुजीचा मृत्यू झाला.

यावरून स्थानिक गुन्हे शाखेने नवनीत याला ताब्यात घेतले असून चौकशी केली असता त्यानेच हा खून करून मृतदेह रस्त्याच्या बाजूला गवतात टाकून दिल्याचे कबूल केले. यावरून पोलिसांनी अर्जुनसिंग आणि नवनीत या दोघांना अटक केली. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खुणे, सहाय्यक फौजदार विजय पाटील, पोलीस हवालदार प्रकाश वाघमारे, पोलीस नाईक रौफ इनामदार, ज्ञानेश्वर क्षीरसागर, गणेश महाडिक, सचिन गायकवाड, गुरू जाधव यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.