Vadgaon Maval Crime News : माथाडी मुकादमचा बियरच्या बाटलीने खून

एमपीसी न्यूज – कामगारांच्या नियमाप्रमाणे रक्कम न घेता वाढीव रक्कम घेत असल्याच्या रागातून माथाडी मुकादमच्या छातीवर, पायावर डोक्यात बिअरची बाटली फोडून खून केला. ही घटना बुधवारी (दि. 16) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील पवना बंदिस्त जलवाहिनीच्या ठेवलेल्या पाईपजवळ, बोऱ्हाडेवस्ती समोर साते येथे घडली. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

घटनास्थळी वडगाव मावळ पोलिसांनी त्वरित धाव घेतली असून मृतदेह ताब्यात घेतला असून शुक्रवारी (दि.18) खुनातील आरोपींना वडगाव मावळ न्यायालयाने सोमवार (दि.21) पर्यंत पोलीस कोठडी दिली.

ज्ञानोबा पांडुरंग मुजुमले (वय 55, रा. कोंडणपुर ता. हवेली पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर रणजित राजेंद्र देशमुख (वय 24), सचिन रमेश बंदीछोडे (वय 20), व ऋतिक सोमनाथ डोंगरे (21) रा. वडगाव ता. मावळ जि. पुणे असे खुनाच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत ज्ञानोबा मुजुमले हे टाटा कंपनी चिंचवड पुणे येथे माथाडी मुकादम होते. आरोपी रणजित देशमुख यांना मेघना कंपनी कडून टाटा मोटर्स कंपनीला माल पोहचविण्याचे ट्रान्सपोर्टचे काम मिळाले. माथाडी कामगारांच्या नियमाप्रमाणे जास्त रक्कम घेत होता. त्यामुळे आरोपी रणजित देशमुख यांनी रक्कम कमी करण्याची विनंती केली होती. मयत मुजुमले हे रक्कम कमी करण्यास तयार नव्हते. त्यामुळे आरोपी रणजित देशमुख याने महिन्याला एक रकमी दोन लाख रुपये देण्याचा प्रस्ताव दिला. मयत ज्ञानोबा मुजुमले याने विचार करतो म्हणून सांगतो असे सांगितले.

बुधवारी (दि.16) सायंकाळी साडे पाच वाजता मयत ज्ञानोबा मुजुमले यांना आरोपी रणजित देशमुख, सचिन बंदीछोडे व ऋतिक डोंगरे यांनी के एस बी चौक पुणे येथे भेटले त्यावेळी आरोपींनी मयत मुजुमले यास लोणावळा येथे पार्टी देतो असे सांगून आरोपी रणजित देशमुख हे मयताच्या एम जी व्हिक्टर एम एच 12 एस एल 3663 क्रमांकाच्या कार मध्ये बसला व सचिन बंदीछोडे व ऋतिक डोंगरे त्याच्या स्विफ्ट कार मधून मयत मुजुमले यांच्या कार च्या पाठोपाठ आले.

आरोपी रणजित देशमुख याने ब्राम्हणवाडी साते गावच्या हद्दीत धनंजय नवलाखा यांच्या मिळकतीमध्ये पवना बंदिस्त जलवाहिनीच्या लोखंडी पाईप ठेवलेल्या ठिकाणी घेऊन जाऊन आरोपी सचिन बंदीछोडे, ऋतिक डोंगरे व मयत मुजुमले यांनी दारू पिली. दरम्यान, माथाडी कामगारांच्या रक्कमेवरून आरोपी रणजित देशमुख व ज्ञानोबा मुजुमले यांच्यात भांडण झाले. त्यावेळी आरोपींनी मयताच्या डोक्यात दगड घालून डोक्यात बिअरची बाटली फोडून छातीत बिअर च्या बाटलीच्या काचा घुपसून खून केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उप निरीक्षक संतोष चामे, विकास सस्ते, कर्मचारी मनोज कदम, श्रीशल कंटोळी, भाऊसाहेब खाडे आदींनी धाव घेतली.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस उप निरीक्षक रामेश्वर धोंडगे, संतोष चामे, विकास सस्ते, कर्मचारी प्रकाश येवले, मनोज कदम, श्रीशल कंटोळी, भाऊसाहेब खाडे, अमोल कसबेकर आदींनी सूत्रे फिरवून आरोपींना अटक केली.

आरोपींना काही तासातच आरोपी अटक केल्याने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मित्तेश घट्टे व उप अधीक्षक राजेंद्र पाटील यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले.

आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी (दि.18) दुपारी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, खुनाच्या गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी सोमवारी (दि.21) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या गुन्ह्याचा पुढील पोलीस उप निरीक्षक विकास सस्ते करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.