Maval News : शिरे शेटेवाडीमधील बाधितांचे पुनर्वसन करा; पंधरा दिवसात पुनर्वसन न केल्यास उपोषण करण्याचा ग्रामस्थांचा इशारा

एमपीसी न्यूज – मावळ मधील आंद्रा धरण प्रकल्पात 13 गावातील शेतकऱ्यांची 600 हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांचे व शेतीवर आधारित असलेल्या अनेकांचे उपजीविकेचे साधन गेले. यामुळे गावक-यांनी गावठाण पुनर्वसन करण्याची मागणी शासन दरबारी केली. वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे सन 2005 मध्ये राज्यपालांच्या आदेशानुसार शिरे- शेटेवाडी या गावचे गावठाण पुनर्वसन मंजूर झाले; मात्र अनेक तांत्रिक अडचणींमुळे प्रत्यक्ष पुनर्वसन अद्याप झाले नाही. येत्या 15 दिवसात पुनर्वसन करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून पुनर्वसन 15 दिवसात न झाल्यास उपोषण करणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.

मावळ मधील आंद्रा धरण प्रकल्पाला 1998 मध्ये मंजुरी मिळाली. परिणामी 13 गावातील शेतक-यांची 600 हेक्टर जमिन पाण्याखाली गेली व त्यामध्ये शिरे- शेटेवाडी या गावातील शेतक-यांच्याही शेतजमिनी पाण्याखाली गेल्या. त्यामुळे सदर गावातील शेतक-यांचे व ग्रामस्थांना उपजिविकेचे साधन न राहिल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी व गावातील शेतक-यांनी गावठाण पुनर्वसन व्हावे म्हणून मागणी केली.

वेळोवेळी पाठपुरावा करुन माजी आमदार दिगंबर भेगडे, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी उपसभापती शांताराम कदम यांच्या प्रयत्नातुन सन 2002 ते 2005 वेळोवेळी शासन दरबारी सतत मागणी केल्यानंतर सन 3 मे 2005 रोजी राज्यपाल यांचे आदेशानुसार शिरे- शेटेवाडी या गावचे गावठाण पुनर्वसन मंजुर करण्यात आले.

शासन आदेश आर पि.ए. 3819 / प्र.क 121/ 2.4 नुसार मंजुरी मिळाली. परंतु त्या गावांना गावठाण कुठे करावयाचे म्हणुन जागेचा शोध सुरु झाला. दरम्यान , पुनर्वसनासाठी जागा कुठे मिळत नव्हती. येथील सर्व ग्रामस्थांनी गायरान, कॅडबरी कपंनी, शासकीय जागेची मागणी केली परंतु या एकही विभागातून मंजुरी मिळाली नाही. दरम्यान आंबी येथील गायरान गट नं 145 या जागेचा ठराव तत्कालीन सरपंचांनी दिला.

दरम्यान त्या जागेची शासकीय मंजुरी मिळावी म्हणुन पाठपुरावा करण्यात आला.परिणामी पुनर्वसनासाठी दि. 14/09/2010 ला त्या जागेला मंजुरी मिळाली. उपलब्ध झालेल्या जागेवर शासकीय पातळीवर त्या जागेचे ले आउट (नकाशा) बनवण्याची प्रक्रिया सुरू केली. नगर रचना विभागाने काही अटी व शर्तीवर मंजुरी दिली. सन 2013 मध्ये वडगांव मावळ येथील भूमि अभिलेख कार्यालय येथील अधिकारी यांनी सदर जागेची मोजणी करून त्यामध्ये दोन दोन गुंठयाचे प्लॉट पाडले.

दि 16/07/2014 रोजी प्लॉटचे सोडत करून वाटप करण्यात आले. दरम्यान शासनाने शेतक-यांना चालू बाजार भावाप्रमाणे (रेडीरेकनर) प्रमाणे मोबदला भरण्यास सांगितले असता शेतक-याने त्यास विरोध केला. काही तांत्रिक कारणामुळे वाटप पुढे ढकलले. व त्यानंतर सन 2015 पासुन हा संपुर्ण मावळ तालुका पीएमआरडीच्या अंतर्गत गेल्यामुळे गावठाण हे आर झोन झाल्यामूळे व काही तांत्रिक कारणामुळे वाटप पुढे ढकलले गेले .

परिणामी वेळोवेळी मुंबई मंत्रालय येथे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार दि.19/10/2018 रोजी रेडीरेकनरनूसार प्लॉटचे मुल्यांकन भरुन घ्यावे असा आदेश देण्यात आला. परंतु जागा ही आर झोन नसल्यामुळे त्याची पुर्तता करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे आंबी येथील गट नं 155 पैकी 11 एकर 15 आर क्षेत्र शेती तथा नगर विकास विभागातून रहिवाशी झोन या विभागात फेरबदल करण्याकरिता आदेश देण्यात आला.

दरम्यान दि. 29/06/2019 रोजी 20(3) ला मान्यता भेटली. त्यानंतर पुन्हा 20 (4) साठी प्रयत्न चालू केले व त्यास दि. 05/07/2021 रोजी मंजुरी मिळाली असुन पुढील जागा प्लॉट वाटप करणे व डेव्हलप करणे, मोबदला भरुन घेणे, गावठाण विकसीत करणे, उदा. शाळा, पाणी, लाईट, रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय व इतर 18 सुविधा उपलब्ध करुन देणे. तसेच जुन्या गावठाणाच्या घराचा मोबदला त्वरित देणे हे आदेश असतांना देखील शासकीय स्तरावरील या खात्यातील अधिका-यांच्या उदासिनतेमुळे पुनर्वसन होऊ शकत नाही.

तरी या निवेदनद्वारे आपणांस विनंती करण्यात येत असून हे निवेदन आपणांस मिळाल्या नंतर आपण योग्य ते आदेश देऊन त्वरीत पुनर्वसन करावे. अन्यथा येत्या 15 दिवसामध्ये जर पुनर्वसनचे वरील सर्व विषय सोडवले नाही तर दिनांक 22/3/2022 रोजी सकाळी मंगळूर येथील जॅकवेल या ठिकाणी तळेगांव (नवलाख उंब्रे) एम आय डी सी चा पाणी पुरवठा बंद करुन त्या ठिकाणी जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही. तो पर्यंत आम्ही सर्व प्रकल्प बाधित शेतकरी यांचेकडून आंदोलन केले जाईल. याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हंटले आहे.

दरम्यान संबंधित विभागांना निवेदन देण्यात आले आहे. अशी माहिती शेतकरी बचाव कृती समिती अध्यक्ष शांताराम कदम यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.