Pune News : पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना तातडीने सातवा वेतन आयोग द्यावा – बिडकर

पीएमपी अध्यक्षांना सभागृह नेत्यांनी दिले पत्र

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) मधील कर्मचारी, अधिकारी यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ तातडीने देण्यात यावा. मार्च महिन्याच्या पगारात त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महानगपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केली आहे.

पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांना दिलेल्या पत्रात सभागृह नेते बिडकर यांनी ही मागणी केली आहे. पीएमपीएमएलमधील कर्मचारी तसेच अधिकारी यांना अद्यापही सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत नसल्याची तक्रार पीएमटी कामगार संघ (इंटक) यांनी केली होती.

सातवा वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार वेतन मिळावे यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने सभागृह नेते बिडकर यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करत आपले निवेदन त्यांना दिले. त्याची दखल घेत बिडकर यांनी पीएमपीएमएलच्या कर्मचारी आणि अधिकारी यांना तातडीने सातवा वेतन आयोग देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

केंद्र सरकार कर्मचारी, राज्य सरकार कर्मचारी, पुणे महानरपालिकेच्या तसेच पिंपरी चिंचवड महानगरालिकेचे कर्मचारी यांना यापूर्वीच सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे. त्यानुसार त्यांना वेतन देखील मिळण्यास सुरुवात झालेली आहे.

पीएमपी मधील कर्मचारी आणि अधिकारी यांना देखील सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गेल्या वर्षी ठराव करण्यात आला होता. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

त्याचे निवेदन कामगार संघाने दिलेले आहे. यामध्ये लक्ष घालून पुढील महिन्यापासून तातडीने या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वेतन आयोगानुसार पगार देण्यात यावेत असे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.