Shirur : शिरूरचा वाघ जेरबंद करण्याची राष्ट्रवादीची व्यूहरचना ; विलास लांडे यांनी ठोकले शड्डू

(अविनाश दुधवडे)

एमपीसी न्यूज- शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार कोण? हा प्रश्‍न अद्यापही गुलदस्त्यात असला तरी राष्ट्रवादीचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे या मतदार संघातून पुन्हा एकदा शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. सेनेचा शिरूरचा वाघ यावेळी पिंजऱ्यात जेरबंद करायचाच असा चंग राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी यावेळी बांधला आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा दाखवून द्यायचे ध्येय अनेकांनी समोर ठेवले आहे. राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्यामुळे शिरूरसारखा गड पुन्हा एकदा खेचून आणू असा विश्‍वास राष्ट्रवादीसह काँग्रेसचे कार्यकर्ते देखील व्यक्त करीत आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असलेल्या भागात सलग तीनदा खासदार शिवाजीराव आढळराव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला अस्मान दाखविले आहे. माजी खासदार अशोक मोहोळ, माजी आमदार विलास लांडे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम अशा तिघांना ओळीने धूळ चारली आहे. याची सल खुद्द शरद पवार, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांच्या मनात आहे. त्यातूनच अजित पवार यांनी उद्विग्न होऊन शिरूरच्या उमेदवारी बाबत नुकतेच स्वकीयांच्या भूमिकेबाबत जहाल भाष्य केले होते.

यावेळी काहीही करून खासदार आढळरावांच्या ‘अँटी इनकंबेन्सी’चा फायदा घेत या तीन पराभवांचा वचपा काढायचा असा चंग राष्ट्रवादीने बांधला आहे. मागील पंधरा वर्षे शिरूर लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेकडे असून खासदार आढळराव यांनी आपले ‘अढळ’ स्थान तयार केले आहे. भोसरीचे आमदार असताना लांडे यांनी खासदार आढळराव पाटील यांच्या विरोधात 2009 मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र त्यावेळी आढळराव यांनी लांडे यांचा मोठ्या मताधिक्‍याने पराभव केला होता. दहा वर्षांपूर्वीच्या पराभवास कारणीभूत असलेल्या खासदार आढळराव यांना ‘घरचा रस्ता’ दाखवण्यासाठी आतूर असलेल्या लांडे यांनी यावेळी राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या आणि एकेकाळी ‘त्यांच्या’ सोबत असलेल्या अनेकांना ‘आपल्या’ सोबत घेऊन जोरदार मोर्चेबांधणी आणि तयारी चालवली असल्याचे बोलले जात आहे.

आढळराव यांच्यासारखा सेनेचा ‘वाघ’ पिंजऱ्यात जेरबंद करून खासदार होण्याचा चंग विलास लांडे यांनी बांधला आहे. त्यामुळेच चाकणमध्ये आलेल्या विलास लांडे यांनी खासदार आढळराव यांना ‘ब्ल्यू प्रिंट’, बैलगाडा शर्यती, पुणे नाशिक लोहमार्ग व महामार्ग, विमानतळ, रोजगार, विकासकामे आदी मुद्द्यांवर घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या सोबत खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि कॉंग्रेसचे नेते अमोल पवार होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.