Pune : ‘मुळशी पॅटर्न’चे निर्माते पुनित बालन आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांची तमाशा कलावंताना मदत

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका सर्वच क्षेत्रातील लोकांना बसत आहे. सध्या करोनामुळे गावोगावच्या यात्रा रद्द झाल्या आहेत, याचा मोठा आर्थिक फटका तमाशा कलावंताना बसला आहे. त्यांच्या मदतीसाठी ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे निर्माते व युवा उद्योजक पुनित बालन आणि लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी पुढाकार घेतला आहे.

होळी पौर्णिमा ते बुद्धपोर्णिमा असा विविध गावातील यात्रेचा काळ असतो. या कालावधीतील सगळे शो रद्द झाल्यामुळे तमाशा कलावंताना याचा फटका बसला आहे. सध्याच्या याञेच्या काळातील सुपारी बंद झाल्याने अंदाजे नऊ कोटींचा फटका या कलावंतासह इतरांना बसला आहे. त्यामुळे लाँकडाऊनच्या काळात किमान त्याचे घर चालावे याकरता पुनित बालन, प्रविण तरडे यांनी पुढाकार घेतला आहे. यावेळी तरडे आणि पुनीत बालन यांनी रेश्मा पुणेकर आणि अमर गफूरभाई पुणेकर यांच्याशी संवाद साधला.

 

होळी पौर्णिमा ते बुद्ध पौर्णिमा हा आमच्या व्यवसायाचा कालावधी आहे. या काळातील उत्पन्नावरच आमचा वर्षभराचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. मात्र, यंदाचा यात्रांचा हंगाम कोरोनाच्या संकटामुळे मातीमोल झाला आहे. यामुळे आमच्या क्षेत्रातील सर्वच लोकांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. अशा परिस्थितीत पुनीत बालन, प्रविण तरडे यांनी दिलेला मदतीचा हात बहुमोल आहे. रेश्मा पुणेकर : तमाशा कलावंत.

 

काही दिवसांपूर्वी आम्ही चित्रपट, नाट्य क्षेत्रातील पडद्यामागील 450 पेक्षा अधिक कामगारांना मदत दिली. त्यावेळीच आम्हाला तमाशा कलावंताचा प्रश्न समजला. त्यावर आमच्या टीमने काम केले. आज आम्ही प्रातिनिधीक स्वरूपात मदत दिली आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त तमाशा कलावंतापर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा संकटाच्या काळात समाजातील अनेकांनी पुढे येऊन गरजूंना मदत करावी. पुनित बालन : निर्माते, उद्योजक.

 

‘मुळशी पॅटर्न’चे निर्माते पुनीत बालन आणि आमच्या टीमने पडद्यामागील कामगारांना मदत केली, तशीच आता तमाशा कलावंताना मदत केली आहे. होळी पौर्णिमा ते बुद्ध पौर्णिमा हा लोककलवंतांचा व्यवसायीक काळ असतो‌. नेमकं कोरोना याच काळात असल्यामुळे ते पूर्णपणे घरी असणार आहेत. आपल्यासाठी हा प्रश्न 15 दिवस- एक महिन्याचा असला तरी लोककलावंतासाठी संपूर्ण वर्षभराचा आहे. ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट समाजाने उचलून धरला आज समाज संकटात आहे, या काळात समाजाला मदत करणे आमचे नैतिक कर्तव्य आहे, या भावनेतून आम्ही ही मदत करत आहोत.   प्रविण तरडे : लेखक, दिग्दर्शक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.