Pune News : कुख्यात गजानन मारणेचे स्वागत करणे भोवले, मनसेचा विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अटकेत
एमपीसी न्यूज – कुख्यात गजानन मारणे याचे स्वागत करणे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशीष साबळे यांना भोवले आहे. गुन्हे शाखेने त्यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयाने कुख्यात गजानन मारणे याची सोमवारी ( दि. 15 ) निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर त्याच्या समर्थकांनी तळोजा कारागृहापासून कोथरूड मधील चांदणी चौकापर्यंत अलिशान वाहनांतून मिरवणूक काढली होती. त्यापार्श्वभूमीवर कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यासह समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गजानन मारणे कोथरूड परिसरात आल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे आशिष साबळे उपस्थित होते. त्यांनीही समर्थकासोबत मारणेचे दणक्यात स्वागत केले होते. पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.