Nigdi : सहा जणांकडून 13 वाहने जप्त; निगडी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – पाच विधिसंघर्षित बालकांकडून आणि एका आरोपीकडून एकूण 12 दुचाकी आणि एक ऑटो रिक्षा अशी एकूण 2 लाख 45 हजार रुपये किमतीची 13 वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कामगिरी निगडी पोलिसांनी केली आहे.

सुमित रतनलाल ढकोलिया (वय 27, रा. तपोवन झोपडपट्टी, सिद्धिपार्क बिल्डिंगसमोर, अंगणवाडी चौक, मोरेवस्ती, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच अन्य पाच विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या वाहन चोरीबाबत तपास करत असताना निगडी पोलीस ठाण्याचे तपास पथकाला एक तरुण चोरीची दुचाकी घेऊन अंगणवाडी चौक मोरेवस्ती येथे थांबला आहे. पोलिसांनी सापळा रचून त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने ती दुचाकी भक्ती शक्ती बस डेपो निगडी येथून चोरी केली असल्याचे कबूल केले. तसेच त्याने निगडी आणि पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखी दोन दुचाकी चोरल्याचे मान्य केले. यावरून त्याला अटक करून त्याच्याकडून एकूण तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

तपास पथकाचे अधिकारी-कर्मचारी गुरुवारी (दि. 13) निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना तीन अल्पवयीन मुले रिक्षातून (एम एच 12 / क्यू आर 1004) फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी रिक्षा खडकी येथून चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्याकडे अधिक कसून चौकशी केली असता त्यांनी निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन, देहूरोड आणि लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक अशी एकूण पाच वाहने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार तीन जणांकडून पाच वाहने जप्त केली आहेत.

शुक्रवारी (दि. 14) आकुर्डी मधील विठ्ठल मंदिर परिसरातून दोघांना एका दुचाकीसह (एम एच 14 / बी ई 1487) ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ती दुचाकी प्राधिकरण परिसरातून चोरी केली असून त्यासोबत निगडी आणि चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी दोघांकडून पाच दुचाकी जप्त केल्या.

निगडी पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांकडून नऊ दुचाकी, एक ऑटो रिक्षा जप्त केली. तर एका आरोपीकडून तीन दुचाकी असा एकूण 2 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यामुळे निगडी पोलीस ठाण्यातील सहा, देहूरोड पोलीस ठाण्यातील तीन, लोणावळा, खडकी, चिंचवड, पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक असे एकूण 13 गुन्हे उघडकीस आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.