Lonavala Accident News : शिलाटणे गावाजवळ भीषण अपघात; पाचही मृतांची ओळख पटली

एमपीसी न्यूज – मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ आज सकाळी 8.20 वाजण्याच्या सुमारास कार व कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या सगळ्यांची ओळख पटवण्यात यश आले आहे.

मच्छीदेवी नाथुराम तिलक (वय 65), महावीर किसन तिलोक (44), सिमा किसन राज ( वय 36), शालिनी रुपनारायण तिलोक (वय 20, सर्वजण रा. B/706 से.नं. 8 शांती पार्क, मीरारोड ईस्ट ठाणे) व रिहान रिजवान अन्सारी (वय 30, रा. सुफलाई इस्टेट, बिलाल मस्जिद, मुंबई नं. 8) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

मच्छीदेवी यांच्यावर उपचार करण्यासाठी वरील सर्वजण आज सकाळी कोल्हापुरच्या दिशेने जात असताना, शिलाटणे फाट्याजवळ काळाने त्यांच्यावर घाला घातला. उपलब्ध माहितीनुसार मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला असून ते घटनास्थळी पोहोचल्यानंतर दुपारी उशीरा सर्व मृताची ओळख पटविण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी कार क्र. (HR 26 CK 7805) ही कार्ला फाटा सोडल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या मध्ये असणारे दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या कंटेनर क्र. (MH 43 Y 5130) खाली घुसल्याने हा भीषण अपघात झाला. यामध्ये कारमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.